पुणे

..अन् बाहेरच्या माणसांचा चेहरा ही सेनेची ओळख पुसत चालली

backup backup

पिंपरी : नंदकुमार सातुर्डेकर : पिंपरी-चिंचवडमध्ये बाहेरगावहून पोटापाण्यासाठी आलेल्या मंडळींचे नेतृत्व करणार्‍यांची संघटना हा शिवसेनेचा चेहरा हरपतो आहे.

माजी जिल्हाप्रमुख बाबासाहेब धुमाळ, माजी शहरप्रमुख नेताजी चव्हाण अन् आता माजी खासदार गजानन बाबर यांच्या झालेल्या निधनाने तर सेनेची जुनी ओळख चांगलीच पुसली गेली आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये भाडेकरूवर होणार्‍या अन्यायाच्या विरोधात संघर्षासाठी काळभोरनगर येथे शिवसेनेचे रोपटे लावण्यात आले. फुगेवाडी शिवसेना शाखेचे उद्घाटन तर खुद्द शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते झाले होते.

मात्र, पक्षांतर्गत वादात पक्ष संघटना व शिवसैनिक पोखरले गेले.असे असतानाही बाहेरच्या मंडळींचे पक्षावर वर्चस्व कायम राहिले.मात्र, बाहेरच्या मंडळींचा चेहरा ही शिवसेनेची प्रतिमा लोप पावू लागली. काळाच्या ओघात पैसा शक्तीला महत्व आले.

त्यात शिवसेनेनेही इतर पक्षांप्रमाणे पक्ष निष्ठेपेक्षा पक्ष वाढीला महत्त्व दिले. साहजिकच स्थानिक प्रस्थापितांचा शिवसेनेत मोठ्या प्रमाणात शिरकाव झाला.

सन 2009 च्या लोकसभा निवडणुकीत मावळ मतदारसंघातून निवडून आलेल्या गजानन बाबर यांना डावलून शिवसेनेने सन 2014 च्या निवडणुकीत श्रीरंग बारणे यांना उमेदवारी दिली.

त्यावेळी बाबर यांनी शिवबंधन तोडले. त्यांचे समर्थकही शिवसेनेबाहेर पडले. काही काळाने तत्कालीन जिल्हाप्रमुख बाबासाहेब धुमाळ, माजी शहरप्रमुख नेताजी चव्हाण यांचे निधन झाले.

त्यामुळे बाहेरच्या माणसांचा शिवसेनेवर असलेला ठसा पुसला गेला. खासदार श्रीरंग बारणे, नुकतेच भाजपात प्रवेश केलेले शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, गटनेते राहुल कलाटे सर्व स्थानिक मंडळींच्या हातात सूत्रे गेली.

तिकीट नाकारले गेल्यानंतर मनसेत प्रवेश केलेल्या गजानन बाबर यांचे मन मनसेत रमले नाही, भगवा खांद्यावर घेण्यासाठी त्यांनी खूप धडपड केली.

प्रचंड वेटिंग केल्यानंतर त्यांना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेत प्रवेश दिला, मात्र त्यांचे नुकतेच निधन झाले, त्यामुळे बाहेरच्या मंडळींचा चेहरा ही शिवसेनेची प्रतिमा पुसली गेली आहे.

केवळ उबाळे, माजी आमदार चाबुकस्वार तग धरून

पक्षविरोधी कारवाया केल्याबद्दल सन 2009 च्या लोकसभा निवडणुकीत नगरसेविका सीमा सावळे व आशा शेंडगे यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली. सन 2017 च्या निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर लढून दोघीही निवडून आल्या.

शिवसेनेच्या जिल्हा महिला संघटिका सुलभा उबाळे व ज्येष्ठ शिवसैनिक रामभाऊ उबाळे, माजी आमदार अ‍ॅड. गौतम चाबुकस्वार हे आता बाहेरच्यांचा चेहरा म्हणून सेनेत तग धरून,अस्तित्व टिकवून आहेत तेवढेच

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT