‘तू आम्हाला पैसे दे, नाहीतर तुला सोडणार नाही; येरवडा पोलिसांचा धक्कादायक कारनामा File Photo
पुणे

Pune Crime: ‘तू आम्हाला पैसे दे, नाहीतर तुला सोडणार नाही; येरवडा पोलिसांचा धक्कादायक कारनामा

दोघांनी एका तरुणाला धमकावून त्याच्याकडे पन्नास हजार रुपये मागितले.

पुढारी वृत्तसेवा

पुणे: बाणेर बीट मार्शलचा लाचखोरीचा प्रकार ताजा असतानाच येरवडा पोलिस ठाण्यातील दोन पोलिसांचा कारनामा समोर आला आहे. या दोघांनी एका तरुणाला धमकावून त्याच्याकडे पन्नास हजार रुपये मागितले. तो हात जोडून विनंती करत होता. ‘अहो, माझी चूक काय आहे? हे तरी सांगा.’ परंतु, त्याला पोलिसांनी चौकीसमोर उभे करून ठेवले.

‘तू आम्हाला वीस हजार रुपये तरी दे, नाहीतर तुला सोडणार नाही,’ असे म्हणत ‘खाकी’चा रुबाब झाडत दर्डावले. त्यामुळे पोलिस नव्हे, हे तर खंडणीखोर, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. दरम्यान, तरुणाने प्रसंगावधान राखत आपल्या मामाला ही माहिती दिली. त्यांनी तरुणाला कोणालाही पैसे न देता थेट येरवडा पोलिस ठाणे गाठण्यास सांगितले. त्यानंतर तरुणाने पैसे मागणार्‍या दोन पोलिसांच्या विरुद्ध तक्रार दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण हा टिंगरेनगर येथे राहणारा असून, तो कॉलेजमध्ये शिकतो. गुरुवारी (दि. 24) वैद्यकीय उपचारांसाठी तो कॉमर्स झोन येरवडा येथील एका डॉक्टरकडे आला होता. काम झाल्यानंतर तो बाहेर पडला. तरुणाला त्याची मैत्रीण भेटली. त्या वेळी सायंकाळचे पाच वाजले होते. तरुण आणि त्याची मैत्रीण दोघे चारचाकी गाडीत बसून गप्पा मारत होते. या वेळी एक पोलिस दुचाकीवरून आला.

त्याने दोघांची कोणत्याही प्रकारची खात्री न करता, तुम्ही दोघे या ठिकाणी अश्लील चाळे करत आहात. मला पन्नास हजार रुपये द्या, नाहीतर तुमच्यावर कारवाई करतो, असे धमकावले. साहेब, आम्ही गाडीत बोलत बसलोय, असे तरुणाने सांगितले. पैसे मागणार्‍या पोलिसाने फोन करून दुसर्‍या एका पोलिसाला बोलावून घेतले.

त्याने देखील तरुणाला धमकावत तुला आम्हाला पैसे द्यावेच लागतील, नाहीतर तुमच्या दोघांवर कारवाई होईल, असे म्हटले. दोघांना तरुणाने त्यांची नावे विचारली. परंतु, त्यांनी आपली नावे सांगितली नाहीत. हा प्रकार पाहून तरुणाची मैत्रीण घाबरली होती. सुरुवातीला पन्नास हजार रुपयांची मागणी केलेल्या पोलिसाने तरुणाकडे पुन्हा वीस हजार रुपये मागितले.

तरुणाने पैसे देण्यास नकार देत, त्याच्या मामाला हा प्रकार फोनद्वारे सांगितला. तरुणाला गाडी जप्त करण्याची धमकी देत पोलिसांनी पैसे मागितले. तरुणाला दोघांनी जेल रोड पोलिस चौकीबाहेर थांबवून ठेवले. त्याची गाडी चौकीला घेऊन आले. तरुणाच्या मामाने येरवडा पोलिस ठाण्यात त्याला बोलावून घेतले.

तोपर्यंत हा पोलिसांकडून पैसे मागण्याचा प्रकार येरवडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र शेळके यांच्यापर्यंत पोहचला होता. त्यांनी तरुणाची तक्रार दाखल करून घेतली. त्या वेळी तरुणाला समजले की, या दोन पोलिसांची नावे पोलिस शिपाई दयानंद कदम आणि अविनाश देठे अशी आहेत. दोघे तपास पथकात काम करीत असल्याची माहिती आहे.

रक्षकच जेव्हा ब्लॅकमेलर होतात?

तरुण-तरुणीला धमकावून पैसे उकळू पाहणारे असे पोलिस काय कामाचे? असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत. तरुण-तरुणीला धमकावून त्यांना कारवाईचा धाक दाखवत ब्लॅकमेलिंग करीत पोलिसच जर खंडणी उकळू लागले, तर तक्रार करायची कोणाकडे? हा देखील मोठा प्रश्न आहे.

संबंधित तरुणाने न घाबरता थेट पोलिस ठाण्यात तक्रार केली म्हणून दोन पोलिसांचा हा पराक्रम पुढे आला; अन्यथा आत्तापर्यंत त्यांनी अशाप्रकारे किती जणांना आपले सावज बनवले असेल, हे शोधण्याची गरज आहे. जनतेच्या रक्षकांचा हा भक्षणाचा प्रकार संताप आणणारा असल्याचे दिसून येतो.

संबंधित तरुणाने आमच्याकडे याबाबत तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार त्याचा जबाब देखील घेण्यात आला असून, दोन्ही पोलिस कर्मचार्‍यांचा अहवाल वरिष्ठांकडे पाठवून देण्यात आला आहे.
- रवींद्र शेळके, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, येरवडा पोलिस ठाणे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT