

पुणे: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम अर्थात तात्पुरता निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला. राज्यातील इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल 23.90 टक्के, तर इयत्ता आठवीचा निकाल 19.30 टक्के इतका लागला असल्याचे स्पष्ट झाले.
राज्य परीक्षा परिषदेने शिष्यवृत्ती परीक्षेच्या अंतरिम निकालाची जिल्हानिहाय आकडेवारी प्रसिद्ध केली. इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी राज्यातून 5 लाख 66 हजार 368 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 5 लाख 47 हजार 505 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यातील 1 लाख 30 हजार 834 विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र झाले आहेत.
त्याची टक्केवारी 23.90 आहे. आठवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी राज्यातून 3 लाख 78 हजार 95 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 3 लाख 65 हजार 754 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यातील 70 हजार 569 विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र झाले आहेत. त्याची टक्केवारी 19.30 आहे. पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी पुणे जिल्ह्यातून 61 हजार 551 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यांपैकी 59 हजार 489 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.
त्यातून 17 हजार 786 विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. त्यांचा निकालाचा टक्का 29.90 टक्के आहे. आठवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी 39 हजार 148 विद्यार्थी नोंदणी केली. त्यातून एकूण 37 हजार 751 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी 8 हजार 954 विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. त्यांचा निकालाचा टक्का 23.72 टक्के आहे.