पुणे

प्रवाशांची कसरत थांबणार! पीएमपी ताफ्यात 677 नव्या बस

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पीएमपीच्या ताफ्यात येत्या सहा महिन्यांत 677 नव्या गाड्या दाखल होणार आहेत. यामुळे पुणेकर प्रवाशांना दिलासा मिळणार असून, लटकून प्रवास करण्याची कसरत कमी होणार आहे. शहराच्या लोकसंख्येनुसार पीएमपीच्या ताफ्यात 3 हजार 500 गाड्यांची आवश्यकता आहे. मात्र, सध्या पीएमपीकडे 2 हजार 87 बसगाड्या आहेत. त्यामुळे पुणेकरांना पीएमपीच्या या बसेस अपुर्‍या पडत आहेत. लटकून प्रवास, थांब्यावर तासनतास वाट पाहाणे, पर्यायी खासगी वाहनांसाठी अतिरिक्त पैसे मोजणे, यांसारख्या समस्यांना पुणेकर प्रवाशांना सामोरे जावे लागत आहे. मात्र, आता नव्या बस येत्या सहा महिन्यांत येणार असल्याने पुणेकरांना काही प्रमाणात का होईना दिलासा मिळणार आहे.

प्रवाशांच्या सोयीसाठी येत्या सहा महिन्यांत पीएमपीच्या ताफ्यात 677 बस घेण्याचे नियोजन आहे. यातील 500 बस खरेदीची सध्या निविदा प्रक्रिया सुरू आहे. या बस सहा महिन्यांत येतील. तर मागील शिल्लकमधील 177 नव्या ई-बसदेखील येत्या दीड महिन्यात ताफ्यात दाखल होतील. अशा एकूण 677 बस पुणेकर प्रवाशांकरिता आम्ही उपलब्ध करणार आहोत.

– डॉ. संजय कोलते, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल

हेही वाचा

SCROLL FOR NEXT