नानगाव: पारगाव सा. मा. (ता. दौंड) येथील शेतकरी प्रशांत जगताप, रणधीर सस्ते, विकास बोत्रे, संदीप जेधे व सेंद्रिय शेतकरी वसुधा सरदार यांनी यंदाच्या वर्षी चांगल्या प्रकारे पपई पीक घेतले होते. मात्र, पावसामुळे या सर्व शेतकर्यांच्या पपई पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
या भागातील शेतकरी सध्या नवनवीन पिकांकडे वळला असून, वेगवेगळे प्रयोग करताना दिसून येत आहे. सगळीकडे बर्यापैकी एकच पीक घेतले जाते. मात्र, आपण काहीतरी वेगळ्या पद्धतीने शेती करीत ती कशा प्रकारे फायद्याची होईल, यासाठी सतत प्रयत्न करताना येथील शेतकरी पाहायला मिळतात. (Latest Pune News)
असाच पपई लागवडीचा प्रयत्न पारगाव सा. मा. येथील शेतकर्यांनी केला. चांगल्या प्रकारे बागा देखील फुलविल्या होत्या. मात्र, मध्येच अवकाळी पावसाने झोडपले आणि पपईच्या बागा कोमेजून गेल्या.
या भागात जवळपास बारा एकरांवर पपईचे क्षेत्र होते. पपईची जवळपास सहा महिन्यांची झाडे झाली होती, तर पपईला मोठ्या प्रमाणावर फळे देखील लागली होती. पुढील दीड, दोन महिन्यांत ही फळे काढणीसाठी आली असती व त्यामधून शेतकर्यांना चांगले पैसे मिळाले असेत. शिवाय, या भागात पपईचे पीक देखील चांगले येते, असा आदर्श उभा राहिला असता. मात्र, अवकाळीने हातातोंडाशी आलेला घास हिसकावून घेतला.
पपई लागवडीसाठी शेताची मशागत, रोपे, मजुरी, औषधे आदींचा मोठा खर्च शेतकर्यांना करावा लागला तसेच कष्ट, मेहनत करून पपईबागा देखील चांगल्याप्रकारे शेतात डौलाने उभ्या राहिल्या होत्या. या झाडांना फळे देखील आली आणि पाहिलेले स्वप्न काही दिवसांत पूर्ण होणार तोच पावसाच्या पाण्यात ते वाहून गेले.