पुणे

शहर रेबीजमुक्त होणार! पालिका देणार भटक्या कुत्र्यांना रेबीजचा डोस

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : केंद्र शासनाच्या निर्देशानुसार महापालिकेच्या आरोग्य विभागाने 'रेबीज फ्री पुणे' करण्यासाठी पावले उचलली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सध्या विशेष मोहिमेंतर्गत शहरातील 1 लाख 80 हजार भटक्या कुत्र्यांना रेबीज लसीचा डोस देण्यात येणार आहे. त्यासाठी पशुवैद्यकीय विभागातील सर्व कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. रेबीज विषाणू प्रामुख्याने प्राण्यांमध्ये विशेषत: श्वानांमध्ये असतो. प्राण्यांनी चावा घेतल्यास रुग्णांच्या शरीरात विषाणू शिरल्यानंतर मज्जासंस्थेवर हल्ला करतो. मज्जासंस्थेतून विषाणू मेंदूपर्यंत पोहोचल्यास रुग्णाचा मृत्यू होतो.

गंभीर परिस्थिती टाळण्यासाठी रेबीज होऊच नये म्हणून केंद्र शासनाने पावले उचलली आहेत. संपूर्ण देशातच भटक्या श्वानांचे लसीकरण करण्याची मोहीम आखली असून, त्यामध्ये पुण्याचाही समावेश आहे. लसीकरण केल्यामुळे श्वानांमध्ये रेबीजची लागण होत नाही. त्यामुळे त्यांच्यापासून माणसांनाही रेबीज होत नाही. म्हणून हे लसीकरण महत्त्वाचे आणि गरजेचे आहे. पुण्यात भटक्या कुर्त्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे नियुक्त संस्थांकडून भटक्या कुत्र्यांना पकडून त्यांची नसबंदी करण्यात येते. त्यांना ज्या भागातून पकडले होते, तेथे सोडण्यातही येते. रेबीजमुक्त मोहिमेंतर्गत सर्वच कुत्र्यांचे लसीकरण केले जात असल्याची माहिती पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सारिका फुंडे यांनी दिली.

पुणे रेबीजमुक्त करण्यासाठी लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. शहरात कुत्र्यांना पकडण्यासाठी आणि नसबंदीसाठी आरोग्य विभागाने पाच संस्थांची नियुक्ती केली आहे. त्या संस्थांमार्फतच कुत्र्यांना पकडून रेबीजचा डोस देण्यात येईल. डोस दिल्याची खूणही करण्यात येईल. एका डोसची मर्यादा वर्षापुरती असून, प्रत्येक वर्षी हे लसीकरण करण्यात येणार आहे.

– डॉ. सारिका फुंडे, पशुवैद्यकीय अधिकारी, पुणे महापालिका.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT