पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेतलेल्या 'महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२५' पेपर क्रमांक एक आणि पेपर क्रमांक दोनची अंतरिम (तात्पुरती) उत्तरसूची 'https://mahatet.in' या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे.
राज्य परीक्षा परिषदेतर्फे २३ नोव्हेंबर संबंधित परीक्षा घेण्यात आली. परीक्षेसाठी प्रश्नपत्रिका क्रमांक एक आणि प्रश्नपत्रिका क्रमांक दोन याबाबत कोणत्याही प्रश्नाबाबत किंवा पर्यायी उत्तराबाबत त्रुटी किंवा आक्षेप असल्यास परिषदेकडे २७ डिसेंबरपर्यंत आक्षेप नोंदविता येणार आहे.
प्रश्नपत्रिका आणि त्यातील प्रश्नांबाबत काही आक्षेप किंवा त्रुटींबाबतचे निवेदन पुराव्यासह 'https://mahatet.in' या संकेतस्थळावर परीक्षार्थ्यांच्या लॉगिनमध्ये उपलब्ध 'आक्षेप नोंदणी' या लिंकद्वारे परिषदेकडे पाठवावे. आक्षेपाबाबत लेखी निवेदन टपालाद्वारे, ई-मेलद्वारे पाठविल्यास त्याचा विचार केला जाणार नाही. राज्य परीक्षा परिषदेने दिलेल्या मुदतीत ऑनलाइन आलेल्या आक्षेपांचा विचार करून विषय तज्ज्ञांच्या अभिप्रायानुसार अंतिम उत्तरसूची लवकरच जाहीर करण्यात येईल, असे राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी स्पष्ट केले आहे.