पुणे

पुणे : तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची होणार चाचणी

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : स्टार्स प्रकल्पांतर्गत नियतकालिक मूल्यांकन चाचणीअंतर्गत घेण्यात येणार्‍या पायाभूत चाचणी आणि दोन संकलित मुल्यमापन चाचण्या अशा तीन चाचण्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची पायाभूत चाचणी 17 ते 19 ऑगस्टदरम्यान तसेच अन्य चाचण्या ऑक्टोबर आणि एप्रिल महिन्यात होणार असल्याचे विद्या प्राधिकरणातर्फे जाहीर करण्यात आले आहे. राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमधील इयत्ता तिसरी ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी 2023-24 या शैक्षणिक वर्षात तीन शैक्षणिक प्रगती चाचण्यांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यानुसार हे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी हा प्रकल्प असल्याचे या वेळी जाहीर करण्यात आले आहे. तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची 17 ऑगस्टला भाषा विषय, 18 ऑगस्टला गणित आणि 19 ऑगस्टला इंग्रजी विषयांची लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. संकलित मूल्यमापन चाचणी पहिली ऑक्टोबर महिन्याचा शेवटचा आठवडा किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात तसेच संकलित मूल्यमापन चाचणी दुसरी एप्रिलच्या पहिल्या किंवा दुसर्‍या आठवड्यात घेण्यात येणार आहे.

पायाभूत चाचणी प्रश्नपत्रिकासोबत शिक्षक सूचनापत्र व उत्तरसूची विषयनिहाय, शाळानिहाय आणि इयत्तानिहाय शाळांना पुरविण्यात येणार आहे. प्रश्नपत्रिका फाटणार किंवा भिजणार नाहीत याची दक्षता घेणे गरजेचे आहे. संबंधित चाचण्या दहावी-बारावी परीक्षेप्रमाणे नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना अतिरिक्त ताण देऊ नये आदी सूचना विद्या प्राधिकरणाचे संचालक कृष्णकुमार पाटील यांनी शिक्षण विभागातील संबंधित अधिकार्‍यांना दिल्या आहेत.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT