पुणे : पुढारी वृत्तसेवा : येरवड्यात मध्यरात्री टोळक्याने दहशत माजवली. टोळक्याने पंधरा ते वीस वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली. येरवड्यातील लक्ष्मीनगर भागात मध्यरात्री टोळके आले. त्यांच्याकडे कोयते होते. टोळक्याने लक्ष्मीनगर भागातील वाहनांची तोडफोड करण्यास सुरुवात केली. विरोध करणार्या नागरिकांना शिवीगाळ करून त्यांच्यावर कोयते उगारले. या घटनेमुळे नागरिक भयभीत झाले. टोळक्याने पंधरा ते वीस वाहनांची तोडफोड केली. या घटनेची माहिती मिळतात पोलिसांनी धाव घेतली.
याप्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात जुनेद एजाज शेख (वय 21, रा. लक्ष्मीनगर), अविनाश शिंदे उर्फ सुक्या (वय 20, रा. जय जवाननगर), यांच्यासह चौघांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शाहीद इब—ाहिम सय्यद (वय 38) यांनी फिर्याद दिली आहे.
आरोपींनी दहशत माजविण्याच्या हेतूने परिसरातील वाहनांची तोडफोड केली आहे. तसेच फिर्यादींवर दगडफेक करून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक जमदाडे करीत आहेत.
वाद मिटविण्यासाठी गेलेल्या तिघांवर टोळक्याने प्राणघातक हल्ला केल्याची घटना वडगाव शेरी भागात घडली. याप्रकरणी सहा जणांविरुद्ध चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी तीन सराइतांसह चौघांना अटक केली आहे.
अनुज जितेंद्र यादव, हरिकेश टुणटुण चव्हाण (वय 18), आकाश भारत पवार (वय 23), अमोल वसंत चोरघडे (वय 30) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. इतर दोघा साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अनुज, हरिकेश आणि आकाश सराइत गुन्हेगार आहेत.
याबाबत सौरभ संतोष पाडळे (वय 22, रा. पाडळे निवास, सोमनाथनगर, वडगाव शेरी) याने चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सौरभ पाडळेचा मित्र ऋषिकेश ढोरे याचे आकाशशी भांडण झाले होते. वाद मिटविण्यासाठी सौरभ मित्रांसह वडगाव शेरीतील दिगंबरनगर भागात आला होता. त्या वेळी आकाशने सौरभला मारहाण केली. अनुजने ऋषिकेशवर कोयत्याने वार केले. आरोपींनी शिवीगाळ केली. यांना जिवंत सोडून नका, असे सांगून त्यांनी दगड फेकून मारले. सौरभचा मित्र अभि आगरकर आणि योगेश हे ऋषिकेशला वाचविण्यासाठी गेले. तेव्हा आरोपींनी त्यांच्यावर कोयत्याने हल्ला चढविला. आरोपींनी कोयते उगारून परिसरात दहशत माजविली. सहायक पोलिस निरीक्षक नीलेश घोरपडे तपास करीत आहेत.
हेही वाचा