एकवेळ डुलकी काढा; पण एकाच जागी बसून राहू नका! | पुढारी

एकवेळ डुलकी काढा; पण एकाच जागी बसून राहू नका!

मेक्सिको : दुपारची वामकुक्षी हा अनेकांचा जीव की प्राण असतो. त्यांच्यासाठी ही जणू गुड न्यूज. पण जे लोक दिवसभर एकाच ठिकाणी रट्टे मारून बसणे पसंत करतात, त्यांच्यासाठी मात्र ही चिंतेची बाब ठरू शकते. युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लंडन आणि युनिव्हर्सिटी ऑफ सिडनीने एकत्रित केलेल्या अभ्यासामध्ये असे दिसून आले की, छोट्या मोठ्या हालचाली करत राहिलं तरी हृदयाचं आरोग्य ठणठणीत राहतं. अगदी चालणं, मॉर्निंग वॉकला जाणं किंवा एका जागी उभं राहणं हे सुद्धा फायद्याचं असतं.

कोणतीही हालचाल केली तर हृदयाच्या पेशी अधिक लवचिक होतात आणि हृदय अधिक मजबूत होतं. मात्र, या उलट एकाच जागी बसून राहणार्‍यांना हृदयासंदर्भातील समस्या निर्माण होऊन त्या भविष्यात अधिक गंभीर होऊ शकतात. दीर्घकाळ एकाच जागी बासून काम करण्याचा सर्वाधिक वाईट परिणाम हृदयावर होतो. रोज 6 मिनिटे उत्तम व्यायाम केल्यास कोलेस्ट्रॉल कमी होण्यास सुरुवात होते, असा दावा यात करण्यात आला आहे.

संशोधकांनी केलेल्या दाव्यानुसार, जे लोक एकाच ठिकाणी अनेक तास बसून असतात ते बसल्या बसल्या वेगवेगळे पदार्थ खात असतात. अशा गोष्टींपेक्षा त्यांनी झोप काढल्यास आरोग्याला अधिक फायदा होऊ शकतो. हृदयासंदर्भातील समस्यांपासून सुरक्षित राहण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे व्यायाम करण्याचा आहे. व्यायाम केल्याने हृदय अधिक सुरक्षित राहते. एका जागी बसून काम केल्याने कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते, याचाही या संशोधनात उल्लेख करण्यात आला आहे.

या संशोधनासाठी 15 हजार 253 जणांच्या चाचण्या करण्यात आल्या. या लोकांच्या शारीरिक हालचालींवर लक्ष ठेऊन त्याच्या नोंदी घेण्यात आल्या. 24 तासांसाठी या 15 हजार 253 जणांच्या शरीरामध्ये एक गॅझेट लावून त्यांच्या शारीरिक हालचाली मोजण्यात आल्या.

जे लोक व्यायाम करतात किंवा हालचाल करतात त्यांना हृदयासंदर्भातील समस्या निर्माण होण्याची शक्यता फारच कमी असते. व्यायाम करणार्‍या किंवा सातत्याने हालचाल करणार्‍यांच्या रक्तातील साखरेचं प्रमाणही कमी होतं. दिवसभरात अगदी 4 ते 12 मिनिटे व्यायाम केला तरी हे अधिक लाभदायी ठरते.

दररोज किमान 30 मिनिटे व्यायाम केला तरी फायदा होतो. एका जागी बसून काम करण्याच्या कालावधीतून हे 30 मिनिटे काढून वजन कमी करणे, कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करणे तसेच रक्तातील साखर कमी करणे यासारख्या गोष्टी या छोट्या व्यायामाने सहज शक्य आहेत.

अनेक तास एका जागी बसून काम करण्याऐवजी अगदी झोपा काढणेही आरोग्यासाठी अधिक फायद्याचे असते. योग्य पद्धतीने झोप घेणार्‍या बॉडी मास्क इंडेक्स उत्तम असते. तसेच वजन नियंत्रणात राहण्यासाठी याचा फायदा होतो.

Back to top button