Money Pudhari
पुणे

Terminated Teachers Illegal Salary: सेवासमाप्त शिक्षकांना नियमबाह्य वेतनाचा आरोप; कोट्यवधींची वसुली करण्याची संस्थाध्यक्षांची मागणी

पश्चिम महाराष्ट्र एज्युकेशन ट्रस्टचा शिक्षण विभागावर गंभीर आरोप; वेतन तत्काळ बंद करण्याचे उपसंचालकांचे निर्देश

पुढारी वृत्तसेवा

पुणे: पश्चिम महाराष्ट्र एज्युकेशन ट्रस्टच्या काही शिक्षकांनी संस्थेत अपहार केल्याचा आरोप करून संस्थेने त्यांची सेवासमाप्ती २३ जानेवारी २०२४ ला केली. परंतु, संबंधित शिक्षक अद्यापही संस्थेत येत असून, शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांशी संगनमत करून पगार घेत असल्याचा खळबळजनक आरोप संस्थेचे अध्यक्ष जुबेर खान यांनी केला आहे. तसेच, संबंधित सेवासमाप्त शिक्षकांचे वेतन तत्काळ बंद करून आत्तापर्यंत दिलेले वेतन सक्तीने वसूल करण्याची मागणी केली आहे.

खान यांनी उपसंचालक कार्यालयाकडे केलेल्या लेखी तक्रारीनुसार, पश्चिम महाराष्ट्र एज्युकेशन ट्रसंस्थेअंतर्गत लेडी हलिमा बेगम उर्दू प्रायमरी स्कूल आणि हाजी अब्दुल लतीफ फजलानी उर्दू हायस्कूल कोंढवा पुणे या अनुदानित शाळांमध्ये कार्यरत असलेले माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका, प्रयोगशाळा परिचर आणि शिपाई, तसेच प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका आणि शिक्षिका यांनी आर्थिक गैरव्यवहार, बनावट कागदपत्रांचा वापर, अनधिकृत शिक्षक भरती, शाळांच्या नावाने बनावट पॅनकार्ड तयार करणे, परस्पर स्वतंत्र बँक खाते उघडून निधी लाटला आहे. त्यामुळे महाराष्ट्र खासगी शाळांतील कर्मचारी सेवांच्या शर्ती अधिनियम १९७७ व नियमावली १९८१ नुसार संस्थेने चौकशी करून संबंधित सर्व कर्मचाऱ्यांची सेवासमाप्ती केली आहे.

संस्थेचा असा आरोप आहे की, सेवासमाप्ती केल्यानंतर सेवा समाप्त कर्मचाऱ्यांना त्या दिनांकापासून शिक्षण विभागामार्फत वेतन देण्याचे कुठल्याही नियमात बसत नाही. म्हणून संबंधित सेवासमाप्ती कर्मचाऱ्यांचे वेतन प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधीकारी कार्यालयाने सुरुवातीचे सहा महिने दिले नव्हते. परंतु, त्यानंतर नियमबाह्यरीत्या संबंधित कर्मचारी व अधिकारी यांनी देवाण- घेवाण करून वेतन चालू केले आणि आजपर्यंत कोट्यवधी रुपयांचा मोठा आर्थिक भ्रष्टाचार बडतर्फ कर्मचारी व शिक्षणाधिकारी यांनी केला आहे.

यासंदर्भात शिक्षणाधिकारी, उपसंचालक, संचालक यांना वेळोवेळी भेटून संबंधित बाब लक्षात आणून दिली. परंतु, त्यांनी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. आमच्या संस्थेअंतर्गत शाळेमध्ये सेवामुक्त कर्मचारी व शिक्षण विभागातील संबंधित सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी शासनाचे व संस्थेचे पैसे हडपण्याचा अड्डा समजू नये, त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी तत्काळ अशा कर्मचाऱ्यांचे वेतन बंद करावे आणि नियमबाह्य दिलेले कोट्यवधी रुपयांचे वेतन तत्काळ वसूल करावे, अशी मागणी देखील खान यांनी केली आहे.

नियमबाह्य वेतन तत्काळ बंद करण्याचे उपसंचालकांचे निर्देश

सेवा समाप्त केलेल्या कर्मचाऱ्यांना नियमबाह्य देण्यात येत असलेले वेतन तत्काळ बंद करून संबंधितांकडून शासन निधीची वसुली करणे तसेच जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध शिस्तभंग व दंडात्मक कारवाई करण्याबाबतची तक्रार उपसंचालक कार्यालयाकडे आली आहे. या तक्रारीत हाजी अब्दुल लतीफ फजलानी उर्दू हायस्कूल व लेडी हलीमा बेगम उर्दू प्राथमिक स्कूल या अनुदानित शाळेतील दोन मुख्याध्यापिका, एक शिक्षिका व दोन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची चौकशी करून २२ जुलै २०२४ पासून सेवा समाप्त केली आहे. त्याबाबतचे सर्व आदेश शिक्षणाधिकारी कार्यालयास देण्यात आले आहेत. त्यावर नियमानुसार कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देश उपसंचालक डॉ. गणपत मोरे यांनी माध्यमिकचे शिक्षणाधिकारी भाऊसाहेब कारेकर यांना दिले आहेत. परंतु, कारेकर याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप देखील खान यांनी केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT