पुणे : पोस्टपेड सीम कार्डचे बिल अनामत रकमेतून वजा करीत उर्वरित रक्कम परत करण्याची मागणी केल्यानंतरही ग्राहकाला ते देण्यास टाळाटाळ करणाऱ्या टेलिकॉम कंपनीला ग्राहक आयोगाने दणका दिला आहे. बिलाची रक्कम कपात केल्याच्या तारखेपासून 1 हजार 258 रुपये वार्षिक पाच टक्के व्याजासह 45 दिवसांत परत करण्याचे जिल्हा ग्राहक आयोगाने दिले. अध्यक्ष अनिल जवळेकर आणि सदस्या शुभांगी दुनाखे यांनी हा निकाल दिला.
कंपनीने रक्कम वजा केली मात्र उर्वरित 1 हजार 258 रुपये परत न केल्याप्रकरणी त्यांनी ॲड. योगेंद्र सिंह राजपूत यांचेमार्फत ग्राहक आयोगात धाव घेतली. त्यावर आयोगाने कंपनीने तक्रारदाराची उर्वरित रक्कम परत न करणे ही सेवेमधील त्रुटी असून अनुचित व्यापारी पध्दत असल्याचे नमूद करत भरपाई तसेच तक्रारीचा खर्च देण्याचा निकाल दिला. त्यानुसार 1 हजार 258 रुपये वार्षिक पाच टक्के व्याजासह 45 दिवसांत परत करण्यात यावे. तसेच, मानसिक त्रासाबद्दल नुकसानभरपाई म्हणून तीन हजार तसेच तक्रारीच्या खर्चापोटी दोन हजार रुपये देण्याचे आदेश दिले.
याप्रकरणी, बालेवाडी येथील राजेश नायर यांनी टेलिकॉम कंपनीविरोधात 25 जानेवारी 2016 रोजी ग्राहक आयोगात दाद मागितली होती. ते कंपनीचे पोस्टपेड सीमकार्ड वापरत होते. त्याबदल्यात त्यांनी कंपनीकडे तीन हजार रुपये अनामत भरली होती. कंपनी बदलण्यापूर्वी आलेल्या बिलाची रक्कम अनमात रकमेतून वजा करून उर्वरित रक्कम पाठविण्याची विनंती त्यांनी कंपनीला केली.
ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी ग्राहक आयोगाची ही भूमिका अत्यंत स्वागतार्ह आहे. अल्प रकमेबाबतही ग्राहकांनी न्यायालयीन मार्गाने हक्कांसाठी लढा दिला हे प्रेरणादायी आहे. टेलिकॉम कंपन्या किंवा सेवा पुरवठादारांनी ग्राहकांच्या अनामत रक्कमा वेळेवर परत करणे ही त्यांची कायदेशीर जबाबदारी आहे. या निर्णयामुळे कंपन्यांना ग्राहकांकडे जबाबदारीने वागण्याचा संदेश मिळेल.ॲड. महेंद्र दलालकर, अध्यक्ष, ग्राहक हितरक्षणाय फाउंडेशन, महाराष्ट्रम