

पुणे : पुणे विमानतळाच्या इतिहासात प्रथमच एकाच दिवसात तब्बल 35 हजारांहून अधिक प्रवाशांची वाहतूक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, कोणताही मोठा सण, उत्सव किंवा सुट्यांचा हंगाम नसतानाही पुणे विमानतळाने शुक्रवारी प्रवासी वाहतुकीचा एक नवा ऐतिहासिक विक्रम रचला आहे.
विमानतळ प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी, 14 नोव्हेंबर 2025 रोजी पुणे विमानतळावर दिवसभरात 200 विमानांचे आगमन आणि प्रस्थान (प्रत्येकी 100-100) झाले. यादिवशी 17,890 प्रवासी पुण्यात दाखल झाले, तर 17,820 प्रवाशांनी पुण्यातून देशाच्या विविध भागांत आणि परदेशांत प्रवास केला. अशाप्रकारे, एकूण 35,710 प्रवाशांनी एकाच दिवसात प्रवास केल्याची नोंद झाली आहे.
आत्तापर्यंतची ही एका दिवसातील सर्वाधिक प्रवासी वाहतूक ठरली आहे. पुण्यातून विविध शहरांसाठी वाढलेली कनेक्टिव्हिटी, उद्योगांसाठी होणारी ये-जा आणि हवाई प्रवासाला नागरिकांकडून मिळणारी वाढती पसंती, यामुळे हा विक्रमी आकडा गाठणे शक्य झाल्याचे मानले जात आहे. या विक्रमी कामगिरीबद्दल पुणे विमानतळाचे संचालक संतोष ढोके यांनी समाधान व्यक्त केले आहे.
पुणे विमानतळाच्या इतिहासातील एका दिवसातील सर्वाधिक प्रवासी वाहतुकीचा टप्पा ओलांडला आहे. इतर दिवशी 30 ते 32 हजारांच्या घरात एका दिवसात प्रवासी वाहतूक होत असते. शुक्रवारी 35 हजारांपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक झाली.
संतोष ढोके, संचालक, पुणे विमानतळ