

पुणे : शहराच्या वायुप्रदूषणात मागील पाच वर्षांमध्ये 11 टक्के वाढ झाली आहे. ‘जागतिक आरोग्य संघटने’च्या मानकापेक्षा सूक्ष्म धूलिकणाची (पीएम 10) वार्षिक सरासरी पातळी ही सरासरी 88, तर अतिसूक्ष्म धूलिकणाची (पीएम 2.5) पातळी देखील वाढत असून, ती 40 मायक्रोग््रॉम प्रतिक्युबिक मीटरकडे जात आहे.
शहराच्या हवेची गुणवत्ता चिंताजनक असल्याचा अहवाल हाती आला असून, पीएम 2.5 या अतिसूक्ष्म धूलिकणांचे प्रमाण धोक्याच्या पातळीवर असल्याचा निष्कर्ष आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आठ वर्षांच्या आकडेवारीचा आधार घेत हे संशोधन करण्यात आले आहे.
मुंबईतील वातावरण फाउंडेशन आणि एन्व्हायरो कॅटलिस्ट या दोन संस्थांनी हा अहवाल जाहीर केला असून, यात पुण्याच्या हवेची गुणवत्ता ही दिवसेंदिवस गंभीर वळण घेत असल्याचा निष्कर्ष आहे.
ताज्या आकडेवारीनुसार, 2029 ते 2025 या पाच वर्षांत अधिक शहरांमध्ये ‘राष्ट्रीय वातावरणीय वायू गुणवत्ता मानक’पेक्षा (एनएएक्यूएस) धुलिकणांची पातळी
(पीएम 2.5) प्रमाणापेक्षा खूप जास्त आढळली, अशी चिंता अहवालात नमूद करण्यात आली आहे. राज्यातील बहुतांश शहरांमध्ये निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त (पीएम 10) सूक्ष्म धूलिकण आढळून आले आहेत. यात पुणे शहर मुंबईपेक्षा आघाडीवर आहे.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या ‘हवा गुणवत्ता निरीक्षण केंद्रा’च्या सलग आठ वर्षांच्या आकडेवारीवर हा अहवाल आधारित असून, ऑक्टोबर ते फेबुवारीदरम्यान प्रदूषणात मोठी वाढ होते आणि फक्त पावसाळ्यात तात्पुरता दिलासा मिळतो, असा शेरा अहवालात नमूद करण्यात आला आहे.