पुणे; पुढारी वृत्तसेवा : अभियांत्रिकी, औषध निर्माणशास्त्र, वास्तुकला आणि अल्प मुदतीचे अभ्यासक्रम राबविणा-या संस्था आणि स्वायत्त संस्था या तंत्रशिक्षण संस्थांचे मॉनिटरिंग (अवेक्षण) केले जाणार आहे. त्यासाठी संस्थांना 25 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबरदरम्यान माहिती भरावी लागणार असल्याची माहिती राज्य तंत्रशिक्षण मंडळाचे सचिव डॉ. महेंद्र चितलांगे यांनी दिली. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद मान्यता प्राप्त अभियांत्रिकी (स्वायत्त संस्थासह) पदविका संस्था, औषध निर्माणशास्त्र (फार्मसी) पदविका संस्था, वास्तुकला परिषद पदविका संस्था तसेच अल्प मुदतीचे अभ्यासक्रम राबविणा-या संस्था यांचे प्रथम संस्था अवेक्षण शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये 25 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबरदरम्यान करण्यात येणार आहे.
मंडळाशी संलग्न संस्थांना माहिती ऑनलाइन भरण्यास 9 ते 16 ऑक्टोबरपर्यंत लिंक संस्थेच्या लॉगीनमध्ये उपलब्ध करण्यात येईल. सर्व स्वायत्त संस्था आणि ज्या संस्थांचे फक्त एक वेळाच संस्था अवेक्षण केले जाते, अशा संस्था तसेच ज्या संस्थाचे एनबीए मानांकन झाले आहे. तसेच ज्या संस्थांच्या अभ्यासक्रमाला एक्सलंट दर्जा मिळाला आहे अशा सर्व संस्थांनी माहिती भरणे अनिवार्य आहे. संस्थांनी भरलेल्या माहितीनुसार, ऑनलाइन प्रणालीद्वारे त्याचा उपयोग मंडळाच्या विविध उपक्रमांमध्ये करण्यात येत असल्याने संबंधित संस्थाप्रमुखांनी माहिती अचूक व परिपूर्ण असेल याची खात्री करून घ्यावी.
संस्थांनी 8 ऑक्टोबर अखेरपर्यंतची शैक्षणिक माहिती भरणे अपेक्षित असून, संबंधित माहिती 16 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करून सबमीट करणे आवश्यक आहे. 17 ते 18 ऑक्टोबर या कालावधीत अभियांत्रिकी, फार्मसी व वास्तुकला संस्थांसाठी पाच हजार आणि अल्प मुदतीचे अभ्यासक्रमाच्या संस्थांसाठी 3 हजार एवढे विलंब शुल्क भरून माहिती सबमीट करता येईल. माहिती न भरणा-या संस्थांना 10 हजार रुपये दंड करण्यात येणार आहे.
हेही वाचा