

पुणे : मुंबई, दिल्ली, पुण्यासह देशातील महत्त्वाच्या सात शहरांत गेल्या पाच वर्षांपासून परवडणार्या घरांचा टक्का आकसत असून, दीड कोटी रुपयांवरील लक्झरी घरांची उपलब्धता वाढत आहे. बांधकाम व्यावसायिकांकडून उभारण्यात येणार्या प्रकल्पांमध्ये 2018 साली परवडणार्या घरांचे प्रमाण तब्बल 42 टक्के होते. त्यात सप्टेंबर 2023 अखेरीस 18 टक्क्यांपर्यंत घट झाली आहे, तर याच काळात लक्झरी घरांचा टक्का 9 वरून 27 टक्क्यांवर गेला आहे.
कोविड-19 नंतर परवडणार्या घरांचा टक्का सातत्याने घसरत असल्याचे दिसत आहे. पन्नास लाखांवरील आणि एक आणि दीड कोटी रुपयांवरील घरांच्या उभारणीत मोठी वाढ झाली आहे. अॅनारॉक रिसर्चने 2018 ते 2013 मधील घरबांधणीच्या स्वरूपात कसा बदल होत आहे, याचा अहवाल सादर केला. त्यातून ही माहिती समोर आली आहे. या पाहणीत नवी दिल्ली, मुंबई महानगर, बेंगळुरू, पुणे, हैदराबाद, चेन्नई, कोलकाता या शहरांचा विचार करण्यात आला आहे.
परवडणार्या श्रेणीतील देशातील घरांचा टक्का सातत्याने घसरत आहे. कोविडपूर्वी 2018 साली देशातील मोठ्या सात शहरांत 52,120 सदनिकांची उभारणी करण्यात आली. त्यात परवडणार्या घरांचा वाटा 21,900 होता. सप्टेंबर 2023 अखेरीस संपलेल्या तिमाहीत 1 लाख 16 हजार 220 सदनिकांची उभारणी करण्यात आली. त्यात परवडणार्या घरांचा वाटा अवघा 20 हजार 920 (18 टक्के) इतका आहे.
दुसरीकडे लक्झरी घरांच्या उभारणीत तिप्पट वाढ झाली आहे. सप्टेंबर 2018 मध्ये देशातील सात महत्त्वाच्या शहरांत अवघ्या 4,950 लक्झरी श्रेणीतील घरांची उभारणी झाली होती. त्यात सप्टेंबर 2023 अखेरीस 31,180 पर्यंत वाढ झाली आहे. पुणे शहरात याच काळात लक्झरी घरांची संख्या 80 वरून 1,940 वर गेली आहे. याच काळात मुंबईतील लक्झरी घरांची संख्या तिपटीने वाढून 7 हजार 830 वर गेली आहे. सप्टेंबरअखेरीस हैदराबादमध्ये सर्वाधिक 14 हजार 340 घरांची विक्री झाली आहे.
साल एकूण घरे परवडणारी घरे परवडणार्या घरांचा टक्का
2018 52,120 21,900 42
2019 45,220 18,540 41
2021 64,560 15,494 24
2022 93,490 16,828 18
2023 1,16,220 20,920 18
शहर जुलै-सप्टेंबर 2023 जुलै-सप्टेंबर 2018
दिल्ली 3,870 9,30
मुंबई 7,830 2,380
बेंगळुरू 1,710 2,90
पुणे 1,940 80
हैदराबाद 14,340 210
चेन्नई 460 580
कोलकाता 1,030 120
एकूण 31,180 4,590
हेही वाचा