बारामती : पुढारी वृत्तसेवा : राज्यामध्ये पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरतीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. राज्यामध्ये शिक्षकांची 30 हजार पदे रिक्त आहेत. तसेच मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षक व केंद्रप्रमुखांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत.
भरती प्रक्रियेपूर्वी या जागा पदोन्नतीने भरण्यात याव्यात, तसेच गेली अनेक वर्ष दुर्गम भागात काम करणार्या शिक्षकांना, तसेच सन 2018 व 2019 मध्ये विस्थापित झालेल्या शिक्षकांना सोयीच्या ठिकाणी बदली व्हावी, याकरिता संधी देण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष केशवराव जाधव यांनी ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे केली. मंत्री महाजन यांनी यासंबंधी सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्याची माहिती पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष नारायण कांबळे व सरचिटणीस सुरेंद्र गायकवाड यांनी दिली.
भरती पोर्टल सुरू करण्यापूर्वी दुर्गम भागातील शिक्षक तसेच सन 2018 व 2019 मधील विस्थापित होऊन पर तालुक्यात गेलेले शिक्षक यांना बदलीची संधी दिली जाईल, अशी ग्वाही ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. ग्रामविकास मंत्र्यांच्या या निर्णयामुळे दुर्गम भागातील शिक्षकांना मोठा दिलासा मिळेल, असे केशवराव जाधव यांनी सांगितले.ें
पुणे जिल्ह्यात मुख्याध्यापकांची 252 पदे रिक्त आहेत. ती तातडीने भरली जावीत, यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लक्ष घातले आहे. लवकरच पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश चव्हाण यांच्या समवेत चर्चा होऊन पदोन्नतीचा प्रश्न सुटेल.
– केशवराव जाधव, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ.
हेही वाचा :