सोलापूरचा तन्मय कटुळे राज्यात प्रथम; एमपीएससीच्या गट ’क’ परीक्षेचा निकाल जाहीर Pudhari
पुणे

MPSC Result: सोलापूरचा तन्मय कटुळे राज्यात प्रथम; एमपीएससीच्या गट ’क’ परीक्षेचा निकाल जाहीर

मागास वर्गवारीमधून पुण्याचा किशोर किसवे राज्यात पहिला; महिला वर्गवारीमधून सांगलीची दुर्गा गावडे राज्यात पहिली

पुढारी वृत्तसेवा

Tanmay Katule MPSC topper

पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएसीमार्फत 17 डिसेंबर 2023 रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र गट ‘क’ सेवा मुख्य परीक्षा 2023 मधील लिपिक-टंकलेखक संवर्गाचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेत सोलापूरचा तन्मय तानाजी कटुळे हा राज्यातून प्रथम आला आहे.

मागास वर्गवारीमधून पुणे जिल्ह्यातील किशोर चंद्रकांत किसवे हा राज्यात प्रथम आला आहे, तर महिला वर्गवारीमधून सांगलीची दुर्गा विजयराव गावडे राज्यात प्रथम आली आहे. त्यामुळे मागील दीड वर्षापासून निकालाची प्रतीक्षा करणार्‍या उमेदवारांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. (Latest Pune News)

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मुंबईसह छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर, नाशिक व पुणे जिल्हा केंद्रांवर घेण्यात आलेल्या महाराष्ट्र गट ‘क’ सेवा मुख्य परीक्षा-2023 मधील लिपिक-टंकलेखक या संवर्गातील एकूण 278 नियुक्ती प्राधिकारी कार्यालयांचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार एकूण 6 हजार 519 उमेदवार संबंधित पदाकरिता शिफारसपात्र ठरले आहे.

अंतिम निकालातील ज्या उमेदवारांना त्यांच्या उत्तरपत्रिकेतील गुणांची पडताळणी करावयाची आहे अशा उमेदवारांनी गुणपत्रके प्रोफाईलवर पाठविल्याच्या दिनांकापासून 10 दिवसांत आयोगाकडे ऑनलाइन पध्दतीने विहित नमुन्यात अर्ज करणे आवश्यक आहे. या संवर्गाकरिता प्रतीक्षा यादी लावण्यात येणार नाही.अधिक माहिती आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचे आयोगाने कळविले आहे.

आमदार हेमंत रासनेंच्या लक्षवेधीने साधले निकालाचे ‘लक्ष’

दोन वर्षांपूर्वी गट ‘क’ लिपिक व टंकलेखकच्या सात हजार पदांसाठी परीक्षा घेण्यात आली होती. परंतु, अंतिम निकाल अद्यापही जाहीर झाला नसल्याची बाब कसबा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने यांनी ‘लक्षवेधी’च्या माध्यमातून विधानसभेत मांडली.

यानंतर अवघ्या काही तासांमध्ये या परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आल्याने सर्व परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. रासने यांनी एमपीएससीच्या कारभारावर बोट ठेवत परीक्षांचे निकाल वेळेत लागत नाहीत, पात्रता यादी वेळेत जाहीर होत नाही, परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक, मानसिक आणि आर्थिक नुकसान होते.

त्यामुळे एमपीएससीला निकालासाठी बंधनकारक कालमर्यादा द्यावी, उत्तरदायित्व निश्चित करणारी स्वतंत्र समिती किंवा लोकपाल नेमावा, विद्यार्थ्यांसाठी मानसशास्त्र व कायदेविषयक सल्ला देणारे केंद्र स्थापन करावे तसेच यूपीएससीप्रमाणे ‘एमपीएससी प्रतिभा सेतू’ उपक्रम सुरू करावा, अशी मागणी विधानसभा सभागृहात केली होती.

या वेळी न्यायालयाने या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात कोणतीही अडचण नसल्याचे नुकतेच सांगितले असून, निकालाची प्रत येताच परीक्षेचा निकाल जाहीर केला जाईल, अशी माहिती राज्याचे माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी दिली होती. यानंतर शासन यंत्रणा तातडीने कामाला लागून गट ‘क’ लिपिक व टंकलेखक परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT