बारामती : पारंपरिक तमाशा कलावंतांनी आपल्या कलेच्या माध्यमातून गावोगावी संस्कृतीचा दीप पेटता ठेवला. मात्र, आज त्याच तमाशा कलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे. तब्बल 18 महिन्यांपासून शासनाकडून मिळणारे मानधन थांबल्याने वृद्ध तमाशा कलावंत आर्थिक संकटात सापडले आहेत.(Latest Pune News)
तमाशा हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य भाग मानला जातो. पिढ्यानपिढ्या रंगभूमीवर योगदान देणाऱ्या कलाकारांना शासनाकडून ठराविक मानधन दिले जाते. परंतु, गेल्या दीड वर्षांपासून हे मानधन न मिळाल्याने अनेक कलावंतांना रोजच्या गरजा भागवणे कठीण झाले आहे. काही जणांना मजुरीकडे वळावे लागले आहे. अनेक कलावंतांचे शरीर वृद्धापकाळामुळे साथ देत नसल्याने त्यांच्यापुढे जगण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे.
बारामती परिसरातील अनेक तमाशा पथकांनी शासनाकडे वारंवार निवेदन दिले. खुद्द मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्रांना निवेदने देण्यात आली. परंतु, शासनाने मे 2024 पासून ते ऑक्टोबर 2025 पर्यंत मानधन दिलेले नाही. तमाशा कलावंत तसेच शाहीरांनी वारंवार मागणी केल्यानंतर शासनाने त्यांच्या मानधनात वाढ करत ते पाच हजार रुपये प्रतिमहा केले होते. त्यामुळे कलावंतांनी शासनाचे अभिनंदन केले होते. परंतु, शासनाकडून फक्त घोषणा झाली. घोषणेपूर्वी मिळणारे मानधनसुद्धा मिळणे बंद झाले. वाढीव मानधनाचा एकही हप्ता या कलाकारांना मिळालेला नाही.
ग्रामीण भागातील अनेक तमाशा कलावंतांचे वय आता 75 च्या पुढे गेले आहे. अनेकांना वाढत्या वयानुसार विविध आजारांनी घेरले आहे. काही कलाकार अंध आहेत, काही आजाराने त्रस्त आहेत. काही कलावंतांवर आता उपासमारीची वेळ आली आहे.
शासनाकडून मागील सर्व हप्त्यांसह दिवाळीला मानधन मिळेल, अशी अनेक कलावंतांची अपेक्षा होती. परंतु, दिवाळीत सुद्धा शासनाने रुपया दिला नाही. कलावंतांचे 18 महिन्यांचे प्रत्येकी 90 हजार रुपये शासनाकडे थकले आहेत.
आम्ही आयुष्यभर लोकांना आनंद दिला. राज्यभर कार्यक्रम केले. आता वृद्धापकाळात शासनच आम्हाला विसरले आहे. आमच्या वयाचा, अडचणींचा विचार करून शासनाने तत्काळ 18 महिन्यांचे मानधन द्यावे.रणधीर मोहिते, राष्ट्रपती प्रशस्तीपत्र विजेते ज्येष्ठ तमाशा कलावंत