नारायणगाव: जुन्नर तालुक्यातील आदिवासी भागातील तळमाचीवाडी येथील तांबरी परिसरात अतिवृष्टीमुळे पुन्हा एकदा भूस्खलनाचा धोका निर्माण झाला आहे. केशव उर्फ लालू साबळे यांच्या घराच्या वरच्या बाजूस मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाल्याने तसेच डोंगर उतारावर नव्याने भेगा पडल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पावसाचा जोर कायम असल्याने नागरिक जीव मुठीत धरून राहत असून प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे. दौडया डोंगराच्या पायथ्याशी वसलेल्या तळमाचीवाडी परिसरात २००५ पासून पावसाळ्यात जमिनीला भेगा पडण्याचे प्रकार घडत आहेत. यंदाही रविवारी (दि. १२ जुलै) झालेल्या अतिवृष्टीमुळे डोंगर उतारावरील जमिनीत मोठ्या भेगा पडण्यास सुरुवात झाली. काही ठिकाणी माती खचून भूस्खलन झाल्याने परिसरातील अनेक कुटुंबांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ग्रामस्थांनी या घटनेची माहिती तातडीने तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर सोमवारी अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा व पाहणी केली. त्याचा अहवाल तहसीलदारांकडे पाठविण्यात आला. त्यानंतर सहा ग्रामस्थांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याबाबत नोटीस देण्यात आली. मात्र, प्रत्यक्षात स्थलांतर, संरक्षण किंवा अन्य उपाययोजनांबाबत कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. ७०० ते ८०० मीटर लांबीची भेग तळमाचीवाडीच्या वरच्या बाजूस असलेल्या पलाडवाडी परिसरापासून काही अंतरावर सुमारे ७०० ते ८०० मीटर लांबीची भेग पडली आहे. या भेगेची खोली व रुंदीही वाढत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. धोक्याची तीव्रता लक्षात घेता वरिष्ठ महसूल अधिकारी, भूगर्भ तज्ज्ञ किंवा आपत्ती व्यवस्थापन विभागाने अद्याप सविस्तर पाहणी केलेली नसल्याची खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली. पुनर्वसन रखडल्याने वाढली चिंता शासनाने तळमाचीवाडीच्या पुनर्वसनासाठी जमीन अधिग्रहित करून काही घरे उभारली आहेत.
मात्र, अनेक वर्षे उलटूनही या घरांचा ताबा लाभार्थ्यांना देण्यात आलेला नाही. काही व्यक्तींनी शासनाच्या परवानगीशिवाय या जागेवर ताबा घेत काटेरी कुंपण उभारल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे पुनर्वसनाच्या जागेकडे जाण्यासही अडचणी निर्माण होत आहेत. आपत्कालीन रस्ताही अडचणीत भविष्यात मोठी आपत्ती उद्भवल्यास नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी आवश्यक असलेला रस्ता अतिक्रमणामुळे आणि पाणी सोडल्याने झालेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे वापरण्यायोग्य राहिलेला नाही. रस्त्याची मोजणी होऊनही तो खुला करण्यात आलेला नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. तहसील प्रशासनाने तातडीने अतिक्रमण हटवून हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. संरक्षण भिंतीच्या कामावर ग्रामस्थांचा आक्षेप तळमाचीवाडीच्या संरक्षणासाठी उभारण्यात आलेली संरक्षण भिंत चुकीच्या ठिकाणी बांधण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. ही भिंत ज्या ठिकाणी उभारण्यात आली, त्या ठिकाणी वाडीचे संरक्षण होत नसून प्रत्यक्ष धोकादायक भाग मात्र असुरक्षितच राहिला आहे.
ग्रामसभा व ग्रामपंचायतीची परवानगी न घेता सार्वजनिक बांधकाम विभागाने हे काम केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. ग्रामस्थांच्या मते, संरक्षण भिंतीच्या कामासाठी करण्यात आलेले दगड खोदकाम, सुरुंगांचे स्फोट आणि मोठ्या प्रमाणातील उत्खनन यामुळेच डोंगराची स्थिरता कमी झाली असून भेगांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे या संपूर्ण कामाची तांत्रिक चौकशी करून संबंधित ठेकेदार व जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. वनराईचे नुकसान संरक्षण भिंतीच्या कामामुळे परिसरातील वनराईचे मोठे नुकसान झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. ज्या भागात दाट वृक्षसंपदा आहे आणि संरक्षण भिंतीची आवश्यकता नव्हती, त्याच ठिकाणी भिंत उभारण्यात आल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे पर्यावरणाचेही नुकसान झाल्याची भावना व्यक्त करण्यात आली. तातडीच्या उपाययोजनांची मागणी धोकादायक भागातील कुटुंबांचे तातडीने सुरक्षित ठिकाणी स्थलांतर, पुनर्वसनाची घरे त्वरित ताब्यात देणे, अतिक्रमण हटवून आपत्कालीन रस्ता खुला करणे, भूस्खलनग्रस्त भागाचा भूगर्भशास्त्रीय अभ्यास करणे आणि संरक्षण भिंतीच्या कामाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी तळमाचीवाडी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे.