

इंदापूर: राज्यातील सर्वच मोठी धरणे पावसामुळे पूर्णक्षमतेने भरून वाहू लागली आहेत. उजनीसह भीमा खोऱ्यातील जलविद्युत केंद्रांमधून वीजनिर्मिती सुरू झाली आहे. त्यामुळे वीजनिर्मिती वाढली आहे. मात्र, ग्रामीण भागातील वीजकपात अद्याप कमी झालेली नाही. दिवसाला आठ ते दहा तास भारनियमन सुरूच आहे. त्यामुळे वाड्या-वस्त्यांवरील शेतकरी, महिला आणि ग्रामस्थांमध्ये प्रचंड संताप आहे.
राज्यात औष्णिक, अणु व जलविद्युत प्रकल्पातून वी निर्मिती केली जाते. उन्हाळ्यात अनेक जलविद्युत प्रकल्प बंद ठेवले जातात. परंतु, पावसाळ्यात धरणे तुडुंब भरल्याने वीजटंचाई संपेल, अशी ग्रामीण भागातील जनतेला अपेक्षा होती. परंतु, प्रत्यक्षात तसे झाले नाही. धरणावरील जलविद्युत प्रकल्पापासून मिळणारी वीज ही एकूण उत्पादनाच्या तुलनेत कमी असली, तरी महावितरणने नियोजन केल्यास हीच वीज ग्रामीण भागातील भारनियमन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
वादळी वाऱ्यामुळे झाडे पडल्याने वीजवाहिन्या तसेच रोहित्रांमध्ये बिघाड वाढले आहेत. वीज तयार असली, तरी ती गावागावांपर्यंत पोहचविणाऱ्या वाहिन्यांवर ताण येत आहे. याच कारणांमुळे महावितरणला लोडशेडिंग करावे लागत असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यातच औद्योगिकीकरणाला विनाखंड वीजपुरवठा दिलाच पाहिजे, असा राजकीय नेतेमंडळींचा अट्टहास आहे. या सगळ्या गोष्टींचा फटका थेट ग्रामीण भागाला बसत आहे.
'धरणे भरली, वीज तयार होते; मग आम्हाला वीज का मिळत नाही?’ असा सवाल शेतकरी विचारत आहेत. शहरांना विनाखंड वीज आणि गावांना मात्र कमी दाबाने विद्युतपुरवठा हा दुजाभाव असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे. यामुळे येत्या काही दिवसांत महावितरण कार्यालयांसमोर निदर्शने करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी भारनियमन तात्पुरते असल्याचे स्पष्ट केले. परिस्थिती लवकरच पूर्ववत होईल, असे आश्वासन देत वेळ मारून नेण्याचा प्रकार सुरू आहे.
आंदोलनांना दाद नाहीच...
इंदापूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये महावितरण कार्यालयासमोर गावकऱ्यांनी आणि शेतकऱ्यांनी एकत्रित येत आंदोलने केली. इंदापूर शहरातील महावितरणच्या कार्यालयासमोर देखील आंदोलन केले. निमगाव केतकी, भिगवणसारखी गावे बंद ठेवण्यात आली होती. मात्र, महावितरणने आंदोलनांना दाद दिली नाही. आता जलविद्युतनिर्मिती सुरू झाल्याने वीजपुरवठा सुरळीत केला जावा, अशी मागणी शेतकरी संघटना आणि ग्रामस्थांनी केली आहे.