पुणे

बस चालवताना फोनवर बोलणे आले अंगलट: आरटीओकडून परवाना निलंबित

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : फोनवर बोलत बस चालवणार्‍या पीएमपी चालकाचा वाहतूक परवाना आरटीओकडून एक महिन्यासाठी निलंबित करण्यात आला आहे. एक पीएमपी चालक फोनवर बोलत, बिनधास्तपणे बस चालवत, प्रवाशांचा जीव धोक्यात घालून सेवा पुरविण्याचे काम करीत होता. या चालकाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यासंदर्भात दै. 'पुढारी'ने नुकतेच वृत्त प्रसिध्द केले. त्याची दखल घेत आरटीओकडून पीएमपी प्रशासनाला या चालकाची माहिती देण्याच्या सूचना करण्यात आली. बेशिस्त चालकाची माहिती मिळाल्यावर संबंधित चालकाचा वाहतूक परवाना पुणे आरटीओकडून महिनाभरासाठी निलंबित करण्यात आला. त्यामुळे या चालकाला आता महिनाभर बस चालवता येणार नाही, अशी माहिती आरटीओ अधिकार्‍यांनी दिली.

मोटार वाहन अधिनियम 1988 च्या कलम 19 तसेच केंद्रीय मोटार वाहन नियम 21 अन्वये फोनवर बोलत गाडी चालविणे गुन्हा आहे. त्यानुसार फोनवर बोलत पीएमपी बस चालवणार्‍या चालकाचा वाहतूक परवाना एक महिन्यासाठी निलंबित करण्यात आला आहे. अशाप्रकारे गाडी चालवताना वाहनचालक आढळल्यास त्यावरही अशीच कारवाई केली जाईल.

– सुजित डोंगरजाळ, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे

चालकांवर कडक कारवाई होणार

फोनवर बोलत गाडी चालवताना मोठा अपघात होण्याची शक्यता असते. अशा प्रकारे गाडी चालवल्यामुळे यापूर्वी देखील अपघात घडले आहेत. त्यामुळे आरटीओकडून अशा वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी कडक पवित्रा घेण्यात आला आहे. एखादा वाहनचालक फोनवर बोलत गाडी चालवताना आढळला तर त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे, असे आरटीओ अधिकार्‍यांनी सांगितले.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT