बोगस बियाणे, खते, किटकनाशके आढळल्यास कठोर कारवाई करा; अजित पवार यांच्या सूचना Pudhari
पुणे

बोगस बियाणे, खते, किटकनाशके आढळल्यास कठोर कारवाई करा; अजित पवार यांच्या सूचना

शेततळ्यांचे अनुदान वाढविण्यासाठी प्रयत्नशील

पुढारी वृत्तसेवा

पुणे: जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात बि-बियाणे, किटकनाशकांच्या बाबतीत तक्रारींकडे तात्काळ लक्ष द्यावे. बोगस बियाणे, खते, बोगस किटकनाशके बाजारात येऊ नये, यासाठी खबरदारी घ्यावी आणि आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिल्या. तसेच शेतकर्‍यांना खरीपात बि-बियाणे, खते, किटकनाशके आदी निविष्ठांच्या पुरेशा उपब्धतेवर लक्ष ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

राज्यात पूर्वी मागेल त्याला शेततळे योजनेत 50 हजार रुपये अनुदान दिले जात होते. ते नंतर वाढवून 75 हजार रुपये केले. आता त्यात वाढ करण्याची मागणी होत असून 1 लाख रुपयांपर्यंत कसे वाढविता येईल यासाठी प्रयत्नशील असल्याचेही ते म्हणाले. (Latest Pune News)

विधानभवन येथे आयोजित जिल्हा खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार राहुल कुल, सुनील शेळके, चेतन तुपे, शंकर मांडेकर, बाबाजी काळे, ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, विभागीय कृषि सह संचालक दत्तात्रय गावसाने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे, आत्माचे प्रकल्प संचालक सूरज मडके, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी अजित पिसाळ आदी उपस्थित होते.

डोंगरी भागात कृषी विभागाच्या योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी तेथील कृषी विभागाची पदे भरण्याची कार्यवाही करण्यात यावी. कृषी विभागाच्या विविध योजनांच्या लाभाची रक्कम महाडीबीटीमार्फत वेळेत शेतकर्‍यांपर्यंत पोहोचेल यासाठी प्रयत्न करावेत अशा सूचना देऊन पवार म्हणाले, जिल्ह्याने अ‍ॅग्री हॅकेथॉनचा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविला आहे.

ज्याचा नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान शेतकर्‍यांपर्यंत पोहोचण्यासाठी उपयोग होईल. शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर होण्यासाठी अर्थसंकल्पात 500 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. शेतकर्‍यांनी प्रत्यक्ष त्याचा वापर करण्यास सुरूवात केल्यानंतर त्यांना त्याचे फायदे लक्षात आल्यानंतर अधिक मागणी होईल. ते पाहता विविध पिकांसाठी या तंत्रज्ञानाचा अवलंब व्हावा म्हणून अधिकची तरतूद करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

यावेळी जिल्हाधिकारी डूडी यांनी प्रास्ताविकात सांगितले, मान्सून वेळेवर येण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली असून त्यानुसार जिल्ह्यात बियाणे आणि खतांच्या पुरेशा उपलब्धतेचे नियोजन करण्यात आले आहे.

जिल्ह्यात खरीपाचे क्षेत्र सुमारे 2 लाख हेक्टर आहे. गेल्या तीन हंगामात सुमारे 34 हजार क्विंटल बियाण्यांची विक्री झाली असून यावर्षी 48 हजार क्विंटल बियाणे पुरवठ्याचे नियोजन करण्यात आले आहे. 1 लाख 96 हजार मे. टन रासायनिक खतपुरवठा मंजूर आहे. त्या नुसार पुरवठ्याबाबत अडचण येणार नाही. युरियाचा 7 हजार 500 मे. टन आणि डी.ए.पी. चा 1 हजार मे. टनचा संरक्षित (बफर) साठा करण्यात येणार आहे.

दरम्यान, प्रारंभी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते कृषी यांत्रिकीकरण अंतर्गत डीबीटीद्वारे अनुदान प्राप्त लाभार्थी शेतकर्‍यांना ट्रॅक्टरचे वितरण करण्यात आले. यावेळी शेतकर्‍यांनी या योजनेचे अनुदान आजच बँक खात्यावर जमा झाल्याचा लघुसंदेश (एसएमएस) उपमुख्यमंत्री महोदयांना दाखविला आणि समाधान व्यक्त केले.

आमदार शेळके, कुल यांच्या मागणीवर प्रस्ताव देण्याच्या सूचना

इंद्रायणी भाताला भौगोलिक मानांकन (जीआय) मिळावे यासाठी प्रयत्न व्हावेत, अशी मागणी आमदार सुनील शेळके यांच्या बैठकीत केली. त्या मागणीच्या अनुषंगाने कृषी विभागाने तात्काळ प्रस्ताव करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेच्या रकमेत वाढ व्हावी, वन विभागाच्या हद्दीतील जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात व्हावीत, अशी मागणी आमदार कुल यांनी केली. त्यावर कार्यवाही निर्देश पवार यांनी दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT