पुणे : गुरुवारी (दि. 6) दुपारची वेळ. स्वारगेट आगारातून अनेक बसची ये-जा अन् प्रवाशांची लगबग सुरू होती. याच गर्दीत अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेतून मोफत एसटी प्रवासाचा लाभ घेत पुण्यातल्या एका नातलगांना भेटण्यासाठी 80 वर्षीय ज्येष्ठ माउली एकट्यानेच आलेल्या; मात्र दुर्देव आड आले अन् घरी पोहचण्यापूर्वीच एसटी आगारातच हृदयविकाराचा तीव झटका येऊन कोसळल्या. आजूबाजूच्या नागरिकांनी व प्रशासनाकडून धावपळ करत डॉक्टरांना गाठले; मात्र उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाले. राज्य शासनाच्या ज्येष्ठ अमृत नागरिक योजनेमुळे ज्येष्ठांना मोफत प्रवासाची संधी मिळाली असली, तरी हा एकट्याचा प्रवास कधी-कधी किती हृदयद्रावक व क्लेशदायक असू शकतो, याची प्रचिती या वेळी आली.(Latest Pune News)
राज्य शासनाच्या ज्येष्ठ अमृत नागरिक योजनेअंतर्गत मोफत प्रवासाचा लाभ घेत आलेल्या ज्येष्ठ महिलेच्या अशा हृदद्रावक अंतामुळे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. प्रवासाची मोफत सुविधा म्हणून नातेवाईकांनी त्यांना एकटे कसे काय प्रवासासाठी जाऊ दिले? एकट्यानेच आलेल्या या माउली कुठून आल्या? त्या कोणाला भेटायला आल्या? अशा प्रसंगी नातेवाईक येईपर्यंत या मृतदेहाची जबाबदारी कुणी सांभाळायची? असे अनेक प्रश्न एसटी प्रशासन आणि पोलिसांसमोर उपस्थित झाले आहेत.
मोफत प्रवासामुळे ज्येष्ठ नागरिकांना फिरण्याची उमेद मिळते, पण याच एकटेपणामुळे अचानक जिवावर बेतणारे संकट ओढवल्यास त्यांची काळजी घेणार कोणी सोबत नसते. या 80 वर्षीय माउलीचा शेवट असा एकाकी आणि हृदयद्रावक झाल्यामुळे ज्येष्ठ अमृत नागरिक योजनेचा लाभ घेताना कुटुंबीयांनी सोबत असणे किती महत्त्वाचे आहे, याची तीव जाणीव उपस्थितांना झाली.
ती 80 वर्षांची माउली एकटी होती. त्यामुळे तिची ओळख पटविणे जिकिरीचे झाले. त्यांच्या बॅगेत किंवा वस्तूंमध्ये कुटुंबाशी संपर्क साधता येईल, अशी कोणतीही स्पष्ट माहिती नव्हती. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांच्या सामानाची तपासणी केली आणि अखेरीस त्यांना पुण्यातील एका घराच्या पत्त्याचा धागा सापडला. या एका लहानशा पत्त्याच्या आधारे, एसटी कर्मचारी आणि पोलिसांनी या माउलीच्या घरी संपर्क साधला. तोपर्यंत, आगारात मृतदेहाजवळ उभ्या असलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची मोठी धावपळ सुरू होती. नातेवाईक येईपर्यंत त्यांची ओळख पटविण्यासाठी, मृतदेह सुरक्षित ठेवण्यासाठी आणि पुढील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी त्यांना प्रचंड कसरत करावी लागली.