Swapnali Pandit corporator Pudhari
पुणे

Swapnali Pandit corporator: संघ-संस्कारातून सभागृहापर्यंत; स्वप्नाली पंडितांचा नगरसेविकेपर्यंतचा प्रवास

महिला सुरक्षा, कचरा व्यवस्थापन आणि वाहतूक कोंडी सोडवण्याचा संकल्प; शनिवार पेठेत भाजपचा मोठा विजय

पुढारी वृत्तसेवा

पुणे : वडील कट्टर हिंदुत्ववादी कार्यकर्ते होते. त्यांच्या समाजसेवेचे संस्कार माझ्यावर लहानपणीच झाले होते. लग्न झाल्यावर पती नितीन पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश मंडळाच्या माध्यमातून मी नागरिकांच्या विशेषत: महिलांच्या समस्या प्राधान्याने सोडवू लागले. आमच्या कामाची दखल भाजपने घेत आम्हाला उमेदवारी दिली. या संधीचे सोने करत मी निवडून आले.आता प्रभागातील समस्या सोडवणार आहे. प्रामुख्याने कचरा व्यवस्थापन, वाहतुकीचा प्रश्न यासह महिलांच्या सुरक्षेवर भर देणार असल्याचा संकल्प भाजपच्या प्रभाग 25 शनिवार पेठ-महात्मा फुले मंडई प्रभागाच्या अ गटातून निवडून आलेल्या नगरसेविका स्वप्नाली पंडित यांनी बोलून दाखवला.

स्वप्नाली पंडित यांना भाजपचे तिकीट मिळाल्यानंतर प्रतिस्पर्धी म्हणून राष्ट्रवादीच्या रूपाली पाटील-ठोंबरे आणि मनसेच्या अमृता भोकरे या होत्या. त्यांचा पराभव करत स्वप्नाली पंडित 22 हजार 987 मते मिळवत विजयी झाल्या आहेत. नुकतीच त्यांनी ‌‘पुढारी‌’ कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. त्या म्हणाल्या, मी मूळची रोहा (ता. रायगड) जिल्ह्यातील. वडील हे कट्टर हिंदुत्ववादी होते. त्यांनी 1992च्या रामजन्मभूमी आंदोलनात सहभाग घेतला होता. त्यामुळे हिंदुत्ववादी संस्कार माझ्यावर देखील झाले. रोहा येथूनच मी कॉमर्समध्ये शिक्षण पूर्ण केले. 2004 मध्ये नितीन पंडित यांच्याशी विवाह झाला.

नितीन हे संघाचे आणि भाजपचे कट्टर कार्यकर्ते. 2002 पासून प्रभागात ते समाजकारण आणि राजकारण करत आहेत. त्यांच्या कामात मी त्यांना सहकार्य करत आहे. घरचा कपड्यांचा व्यवसाय सांभाळून गणपती मंडळामार्फत समाजकार्य करत आहे. महिलांच्या प्रश्नांवर मी काम केले. प्रभागात आम्ही भाजपचे चारही उमेदवार निवडून आलो आहोत. समन्वय ठेवत आता प्रभागातील समस्या सोडवण्यावर मी लक्ष केंद्रित करणार आहे, असे पंडित म्हणाल्या.

प्रभागात करणार ‌‘ही‌’ कामे

प्रभागात महिलांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही बसवणार. प्रामुख्याने तुळशीबाग येथे खरेदीसाठी महिला येत असल्याने या ठिकाणी हे सीसीटीव्ही बसवण्यास प्राधान्य देणार मध्यवस्ती असल्याने व व्यापारी बाजारपेठ असल्याने मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नागरिक खरेदीसाठी येत असतात. त्यामुळे वाहतूक कोंडी हा प्रश्न गंभीर आहे. तो सोडवण्यावर भर देणार. पार्किंगची समस्या सोंडवण्यावर भर देणार. यासाठी मंडई येथील वाहनतळ आधुनिक व त्याची क्षमतावाढीच्या दृष्टीने प्रयत्न करणार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT