

मोशी : पुणे-नाशिक महामार्ग मोशीमधून जातो. या महामार्गाच्या दोन्ही बाजूला सेवा रस्ता नसल्याने शालेय विद्यार्थी, पादचारी यांना या मार्गाने प्रवास करणे धोकादायक ठरत आहे. मोशी गावात भरधाव वेगाने वाहने महामार्गावरून धावतात. त्यात बहुतांश वाहनचालक सिग्नल पाळत नाहीत. यामुळे पादचारी व शालेय विद्यार्थ्यांना महामार्ग ओलांडून शाळेत अथवा घरी जाणे कठीण झाले आहे. यामुळे मोशी भागात महामार्गावरील वाहनांना वेग मर्यादा निश्चित करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
मोशीमधून जाणाऱ्या पुणे-नाशिक महामार्गावर दिवसेंदिवस वाहनांच्या संख्येत वाढ आहे. यामुळे स्थानिकांसह, शालेय विद्यार्थी, पादचारी यांना महामार्ग ओलांडून जाणे खूपच धोकादायक ठरत आहे. या महामार्गाला सेवारस्ता नसल्याने आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना महामार्गावर येण्याशिवाय पर्याय नाही. सेवा रस्त्याअभावी शालेय विद्यार्थ्यांसह सर्व नागरिकांना महामार्गाच्या कडेनेच पायी चालत जाऊन रस्ता ओलांडावा लागतो. टोलनाक्यापासून ते जय गणेश साम्राज्य चौकापर्यंत बिनधोकपणे रस्ता ओलांडून जाणे शक्य होत नाही.
दुचाकीसह सर्वच प्रकारचे वाहनचालक वेगाने वाहने चालवत असल्याने नागरिकांना ताटकळत थांबून नाईलाजाने धोका पत्करून महामार्ग ओलांडावा लागत आहे. महामार्गाचे रुंदीकरण लालफितीत अडकल्याने आहे तो रस्ता अपुरा पडत आहे. त्यात बहुतांश वाहनचालक वेग मर्यादा अथवा गाव, शाळा, वर्दळीचा परिसर याचे भान न ठेवता सुसाट वाहने चालवतात. यामुळे नागरिकांना तसेच वाहनांना अपघात होऊ शकतो. असे लहान मोठे अपघात यापूर्वी घडले आहेत. त्यामुळे महामार्गावर वेगमर्यादा निश्चित करा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
शालेय विद्यार्थ्यांना या वेगवान वाहनचालकांकडून अधिक धोका निर्माण होत आहे. पादचारी महामार्ग ओलांडताना दिसत असताना देखील वाहनचालक वाहने वेगाने दामटतात. पादचा-यांवरच अरेरावी करतात. वास्तविक पाहता नियमानुसार रस्त्यावर पहिला हक्क हा पादचा-यांचा असतो. याबाबत अधिकतर वाहन चालक अनभिज्ञ आहेत. वाहतूक नियमांचे पालन करून या महामार्गावर वेग मर्यादा निश्चित केल्यास होणारे जीवघेणे अपघात कमी होतील व स्थानिकांसह सर्वांनाच अपघाताच्या भयातून मुक्तता होईल.
मागील दोन वर्षांपूर्वी मोशीत पुणे-नाशिक महामार्गालगतचे अतिक्रमण काढलेले आहे. त्याठिकाणी नागरिकांसाठी एक लेन सेवा रस्ता करावा. ज्यामुळे नागरिकांना ये-जा करण्यास सोपे जाईल. विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनांवर नियंत्रण येईल. तसेच चौकामध्ये पूर्णवेळ वाहतूक पोलिस नियुक्त करावेत. वाहतूक व्यवस्थेत नियंत्रण ठेवण्यास मदत होईल.
निखिल बोऱ्हाडे, नगरसेवक
पुणे-नाशिक महामार्गावर मोशी येथे सेवा रस्ता नसल्याने नागरिकांना, पादचाऱ्यांना येणाऱ्या अडचणी याबाबत महापालिका आणि वाहतूक विभाग यांच्यामध्ये समन्वय साधून पर्यायी मार्ग काढण्यासाठी चर्चा करू. तसेच विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहतुकीबाबत काय व्यवस्था करता येईल याबाबत निर्णय घेऊ.
रामचंद्र घाडगे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, तळवडे वाहतूक
सेवारस्त्याची गरज
पुणे-नाशिक महामार्गावर दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत आहे. चारपदरी असणारा महामार्ग रुंद करण्यासाठी प्रशासन वारंवार कारवाई करत आहे. परंतु अद्याप या महामार्गाचे रुंदीकरण झालेले नाही. यामुळे या मार्गावर सकाळी व सायंकाळी मोशी परिसरात वाहनचालक, स्थानिक नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. सेवारस्ता झाल्यास नागरिकांना ये-जा करण्यास सोपे जाईल. तसेच अपघातही कमी होतील. विरुद्ध दिशेने येणाऱ्या गाड्यांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल.