Pune Municipal Corporation Pudhari
पुणे

Sus Road Baner Waste Project: सूस रोड-बाणेरचा कचरा प्रकल्प हलविण्यास महापालिकेचा नकार; ‘याच ठिकाणी सुरू ठेवणे योग्य’

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर पर्यावरणीय उपाययोजना; दररोज ५५ मेट्रिक टन ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया

पुढारी वृत्तसेवा

पुणे: सूस रोड-बाणेर येथील ओला कचरा प्रक्रिया प्रकल्प अन्य ठिकाणी हलविण्याची मागणी पुणे महापालिका प्रशासनाने अमान्य केली आहे. प्रकल्पाच्या ठिकाणी पर्यावरणीय नियमांनुसार तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आवश्यक सुधारणा करण्यात आल्या असून, हा प्रकल्प स्थलांतरित केल्यास शहरातील घनकचरा व्यवस्थापनाच्या यंत्रणेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे प्रकल्प सध्याच्या ठिकाणीच सुरू ठेवणे योग्य असल्याचा अभिप्राय महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी स्थायी समितीला दिला आहे.

सूस रोड-बाणेर विकास मंच आणि स्थानिक नागरिकांनी या प्रकल्पामुळे होणाऱ्या त्रासाचा दाखला देत तो अन्यत्र हलविण्याची मागणी केली होती. याबाबत अमोल बालवडकर आणि बाबूराव चांदेरे यांनी प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावावर स्थायी समितीने प्रशासनाचा अभिप्राय मागविला होता.

या प्रकल्पाच्या स्थलांतरासाठी राष्ट्रीय हरित लवादात याचिका दाखल करण्यात आली होती. लवादाने २०२० मध्ये प्रकल्प स्थलांतरित करण्याचे निर्देश दिले होते. त्याविरोधात महापालिकेने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली. १२ सप्टेंबर २०२४ रोजी सर्वोच्च न्यायालयाने लवादाचा आदेश रद्द करीत आवश्यक पर्यावरणीय उपाययोजना करून प्रकल्प त्याच ठिकाणी सुरू ठेवण्यास मान्यता दिली.

त्यानंतर महापालिकेने प्रकल्पस्थळी विविध सुधारणा केल्या आहेत. कचरा साठविण्याची जागा बंदिस्त केली असून, दुर्गंधी नियंत्रणासाठी मिस्टिंग सिस्टिम बसवली आहे. स्लरी टाकीसाठी फिल्टरव्यवस्था, ॲक्टिव्हेटेड चारकोल फिल्टर, एपॉक्सी कोटिंग, काँक्रीट पार्किंग बे आणि रिजेक्ट कचऱ्यासाठी स्वतंत्र कॉम्पॅक्टरची सुविधा केली आहे. तसेच, परिसरात १६१ नवीन झाडांची लागवड केली असून, पर्यावरणीय बाबींच्या तपासणीसाठी 'नीरी'ची नियुक्ती केली आहे.

दररोज होते ५५ मेट्रिक टन ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया

सूस रोड प्रकल्पात सध्या दररोज ५५ मेट्रिक टन ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते. त्यापासून बायो-सीएनजीची निर्मिती करण्यात येत आहे. हा प्रकल्प बंद करून अन्यत्र हलविल्यास शहरातील विद्यमान कचरा प्रक्रिया केंद्रांवर अतिरिक्त भार पडण्याची शक्यता आहे. परिणामी, कचरासंकलन आणि प्रक्रियेच्या संपूर्ण व्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे उपलब्ध यंत्रणा आणि केलेल्या पर्यावरणीय उपाययोजना लक्षात घेता सूस रोडवरील प्रकल्पाचे स्थलांतर करणे व्यवहार्य नसल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT