पुणे : वाहतुकीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या असलेल्या सूस-नांदे रस्त्याच्या रुंदीकरणास प्रारंभ झाल्याने वाहनधारकांची वाहतूक कोंडीतून लवकरच सुटका होणार आहे. या मार्गावरील चढ-उतार, धोकादायक वळणे, मोडतोड होणारी अरुंद ठिकाणे तसेच भविष्यातील लोकसंख्या वाढ व वाहनभाराचा अंदाज घेऊन हे रुंदीकरण केले जाणार आहे.
हिंजवडी आयटी पार्क येथे जाण्यासाठी सूस नांदे रस्ता महत्त्वाचा मार्ग आहे. मात्र, या रस्त्यावर रोज वाहतूक कोंडी होत होती. यामुळे कर्मचाऱ्यांना वेळेत ऑफिसमध्ये पोहचता येत नव्हते. या मार्गावरची वाहतूक कोंडी सोडविण्यात यावी, अशी मागणी येथील नागरिकांनी केली होती. या मागणीची दखल घेऊन स्वत: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी या रस्त्याची पाहणी करीत या रस्त्याच्या रुंदीकरणाचे आदेश दिले होते. यानंतर शनिवारी आमदार शंकर मांडेकर यांनी या रस्त्याचे भूमिपूजन केल्यावर रुंदीकरणाला सुरुवात झाली आहे. या प्रसंगी महापालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष बाबूराव चांदेरे, शिवाजीराव काळे, सुनील चांदेरे, प्रमोद निम्हण, रोहिणी चिमटे, राहुल बालवडकर, समीर चांदेरे तसेच महापालिकेचे पथ विभागप्रमुख अभियंते आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
या रुंदीकरणामुळे सूस आणि परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून, विद्यार्थ्यांसह कार्यालयीन प्रवाशांची रोजची कोंडी टळणार आहे. व्यापारी दळणवळण अधिक वेगवान होणार असून, अपघातांचे प्रमाण घटण्यास मदत होईल, असे मत माजी स्थायी समिती अध्यक्ष बाबूराव चांदेरे यांनी व्यक्त केले.