उसातील आंतरपिकांमुळे शेतकऱ्यांना दिलासा; उडीद, सोयाबीन, मक्याचा प्रयोग ठरतोय यशस्वी Pudhari
पुणे

Sugarcane Intercropping: उसातील आंतरपिकांमुळे शेतकऱ्यांना दिलासा; उडीद, सोयाबीन, मक्याचा प्रयोग ठरतोय यशस्वी

शेतकर्‍यांनी ऊसशेती फायदेशीर ठरण्यासाठी आंतरपीक घेण्याकडे मोठ्या प्रमाणात कल वाढविला आहे.

पुढारी वृत्तसेवा

Sugarcane intercropping with urad, soybean, maize

काटेवाडी: ऊस हे नगदी पीक मानले जात असले तरी वाढत्या खर्चामुळे ऊसशेती अनेकदा तोट्यात जाते. या पार्श्वभूमीवर बारामती तालुक्यातील शेतकर्‍यांनी ऊसशेती फायदेशीर ठरण्यासाठी आंतरपीक घेण्याकडे मोठ्या प्रमाणात कल वाढविला आहे.

सोनगाव, पिंपळी, काटेवाडी, कन्हेरी, ढेकळवाडी परिसरातील शेतकर्‍यांनी उडीद, सोयाबीन, कांदा, भुईमूग व मका यांसारखी आंतरपिके घेऊन ऊसशेतीचा खर्च सहज वसूल केला आहे. सुरुवातीचा ऊस तसेच खोडवा ऊस या दोन्हीमध्ये आंतरपिकांचा प्रयोग यशस्वी ठरत असून शेतकर्‍यांना अतिरिक्त उत्पन्नाचा फायदा होत आहे.

निरा खोर्‍यातील धरणे 100 टक्के भरल्याने पाणीसाठा मुबलक आहे. त्यामुळे उसाबरोबर आंतरपीक घेणे अधिक फायदेशीर ठरत असल्याचे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे. ऊस लागवडीनंतर पूर्ण उगवणीस साधारण 6 ते 8 आठवडे लागतात.

या कालावधीत केलेला बियाणे, खते व मशागतीचा खर्च आंतरपिकांतून निघतो, असे ढेकळवाडीचे शेतकरी गणेश घुले यांनी सांगितले. त्यांनी पुढे सांगितले की, आंतरपीक घेतल्याने तणांचा प्रादुर्भावही कमी होतो आणि पिकांची वाढ जोमाने होते.

उसाच्या दोन ओळीतील जागा सुमारे तीन ते साडेतीन महिने रिकामी राहते. या काळात सूर्यप्रकाश, खते आणि पाण्याचा कार्यक्षम वापर करण्यासाठी कमी उंचीची, कमी कालावधीत तयार होणारीपिके निवडणे फायद्याचे आहे,’ असे प्रयोगशील शेतकरी राजेंद्र साखरे यांनी सांगितले.

शेतकर्‍यांच्या म्हणण्यानुसार, आंतरपीकामुळे सुरुवातीच्या उसाचा किमान खर्च सहज वसूल होतो, शिवाय अल्पावधीत मिळणारे उत्पादन आर्थिक आधार देऊन ऊसशेतीला टिकाऊ बनवते. त्यामुळे तालुक्यातील शेतकर्‍यांचा उसाबरोबर आंतरपीक घेण्याकडे वाढता कल दिसून येतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT