

पिंपरखेड: शिरूर तालुक्यातील बेट भागात बिबट्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. बिबट्यांचे आता दिवसा सामूहिक दर्शन होत आहे. पाळीव प्राण्यांवरील हल्ल्याच्या घटनांमुळे पशुधन धोक्यात आले आहे.
पूर्वी रात्रीच्या वेळी शेतात बिनधास्त फिरणार्या शेतकर्यांना आता बिबट्याच्या भीतीने रात्रीच्या वेळी सोडाच परंतु दिवसा शेतात फेरफटका मारणे मुश्किल झाले आहे. यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. शेतकरी - बिबट संघर्ष कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी शेतकर्यांकडून होत आहे. (Latest Pune News)
बेट भागासाठी वरदान ठरलेल्या कुकडी व घोडनदीच्या मुबलक पाण्यामुळे पिंपरखेड, काठापूर, जांबुत, चांडोह, फाकटे, वडनेर या गावांत उसाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. उसाच्या शेतात बिबट्याने मुक्काम ठोकला आहे.
या परिसरात बिबट्याने शेळ्या, मेंढ्या, गाय, वासरू, घोडा, कुत्रा या प्राण्यांना ठार केले आहे. वारंवार हल्ला होत असल्याने अनेक शेतकर्यांनी कुत्रा पाळायचे बंद केले आहे. जांबुत पिंपरखेड येथे बिबट्याच्या हल्ल्यात पाच मृत्यूच्या घटना घडूनही या परिसरात बिबट्यांवर नियंत्रण मिळवण्यात वन विभागाला यश आलेले नाही.
बिबट्यांच्या हल्ल्यामुळे शेतकर्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकर्यांकडून पाळीव प्राणी पाळण्याच्या संख्येत घट झाली आहे. एकटा वावरणारा बिबट्या सामूहिकपणे लोकवस्तीत येत असल्याने शेतकरी व नागरिक भयभीत झाले आहेत. पिकांना पाणी देताना अनेकदा बिबट्या दिसत आहे.
जुन्नर वन विभागाकडून सन 2012 मध्ये पिंपरखेड आणि काठापूर परिसरात 16 ठिकाणी कॅमेरा ट्रॅप लावण्यात आले होते. यामध्ये बिबट्या, तरस या वन्यप्राण्यांची छायाचित्रे कैद झाली होती. त्यानंतर बारा वर्षांत येथील बिबट्यांची संख्या आणि हल्ले दिवसेंदिवस वाढतच गेली. वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी बिबट्यांच्या वाढत्या संख्येबाबत अनभिज्ञ असल्याने वन विभागाने या परिसरात नव्याने सर्वेक्षण करून बिबट्यांची गणना करावी, अशी मागणी होत आहे.
शेतकर्यांना आर्थिक भुर्दंड
बिबट्यांपासून पशुधन वाचवण्यासाठी अनेक शेतकर्यांनी गायींच्या गोठ्याला लाखो रुपये खर्च करून बांधकाम व तारेचे बंदिस्त कुंपण केले आहे. तरीही बिबट्याचे हल्ले सुरूच आहेत. बिबट्यामुळे शेतकर्यांना आर्थिक भुर्दंड बसत आहे.
शेतीपंपांना दिवसा विजेची मागणी
ग्रामीण भागात शेतीपंपासाठी आठवड्यातील काही दिवस रात्री वीजपुरवठा असल्याने बिबट्यांची भीती असूनही शेतकर्यांना जीव धोक्यात घालून पिकांना पाणी द्यावे लागते. शेतीपंपासाठी रात्री ऐवजी दिवसा वीजपुरवठा करण्याची मागणी होत आहे.