

TOD meter tampering in Baramati
बारामती: बारामती परिमंडलात टीओडी मीटर छेडछाडीची 57 प्रकरणे उघडकीस आली आहेत. याप्रकरणी संबंधित ग्राहकांवर विद्युत कायदा 2003 नुसार विजचोरीची कारवाई करण्यात आली आहे. विजेची चोरी करणे हा कायद्याने गुन्हा आहे.
तेव्हा ग्राहकांनी कुठल्याही क्षणिक आर्थिक अमिषाला बळी पडून वीज मीटरमध्ये छेडछाड करू नये; अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आवाहन महावितरणच्या बारामती परिमंडलाने केले आहे. (Latest Pune News)
महावितरणकडून अत्याधुनिक टीओडी मीटर ग्राहकांना बसविले जात आहेत, टीओडी मीटर हे थेट महावितरणच्या नेटवर्क सर्व्हरला जोडलेले असल्याने या मीटरमध्ये छेडछाड केल्यास, मीटर नादुरुस्त झाल्यास महावितरणकडे तत्काळ त्याचक्षणी माहिती (रिअल टाईम डाटा) उपलब्ध होते. ज्या टीओडी मीटरमध्ये छेडछाड केल्याच्या नोंदी महावितरणकडे उपलब्ध झाल्या आहेत.
त्या मीटरची प्रत्यक्ष पडताळणी करून बारामती परिमंडळातील57 ग्राहकांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यात बारामती मंडळातील 26, सोलापूर मंडळातील 21 तर सातारा मंडळातील 10 ग्राहकांचा समावेश आहे. या ग्राहकांवर विद्युत कायदा 2003च्या कलम 135 व 138 नुसार वीज चोरीची कारवाई करण्यात आली आहे.
वीजचोरी गंभीर गुन्हा
वीज मीटरमध्ये छेडछाड करून, वीज वाहिन्यांवर आकडे टाकून वा अन्य मार्गाद्वारे वीजचोरी करणे हा विद्युत कायदा 2003 नुसार गंभीर स्वरुपाचा फौजदारी गुन्हा आहे. त्यात सहापट आर्थिक दंड व 6 महिने ते 5 वर्षांपर्यंतच्या तुरूंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे. तेव्हा ग्राहकांनी कुठल्याही आमिषाला व क्षणिक आर्थिक लाभाला बळी पडून वीजचोरीचा प्रयत्न करू नये, असे आवाहन महावितरणच्या बारामती परिमंडलाने केले आहे.