साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांना मागण्यांचे निवेदन देताना महाराष्ट्र राज्य ऊस तोडणी मशिन मालक संघटनेचे शिष्टमंडळ Pudhari
पुणे

Sugarcane Harvesting Maharashtra: 1 नोव्हेंबरपासून ऊस तोडणी बंद ठेवणार मशीन मालक; दरवाढीसाठी संघटनेचा इशारा

प्रति टन दर 500 वरून 700 रुपये करण्याची मागणी; साखर आयुक्तांना निवेदन देऊन निर्णयाची अंतिम मुदत

पुढारी वृत्तसेवा

पुणे : ऊस तोडणीसाठी प्रति टनास पाचशे रुपये असलेला दर दोनशे रुपयांनी वाढवून 700 रुपये करावा, शासन आदेशानुसार ऊस तोडणी मशीन मालक व वाहतूकदार यांच्या बिलातून ऊस पाचट कपात करू नये आणि ऊस तोडणी दरासंदर्भात त्रिस्तरीय समिती स्थापन करावी, या आमच्या प्रमुख मागण्या आहेत. याबाबत तात्काळ निर्णय न झाल्यास दिनांक एक नोव्हेंबरपासून राज्यातील ऊस तोडणी मशीन मालक हे ऊस तोडणीच्या कामकाजात सहभागी होणार नाहीत, असा इशारा महाराष्ट्र राज्य ऊस तोडणी मशिन मालक संघटनेने दिला आहे.(Latest Pune News)

सोमवारी (दि. 27) संघटनेचे सचिव अमोलराजे जाधव यांच्या नेतृत्वाखाली प्रदीप अहिरेकर, शिवानंद मुगळे, लालासाहेब कदम, अवधूत सपकाळ, विनोद सूर्यवंशी, सुनील चव्हाण, योगेश शिवले आदींसह राज्यभरातील संघटनेच्या सभासदांनी साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांची दुपारी भेट घेतली आणि आपल्या मागण्यांचे निवेदन सादर करीत मागण्यावर तोडगा काढण्याबाबतची विनंती केली. त्यावेळेस साखर आयुक्त यांनी आंदोलन करू नका, या प्रश्नांत मी लक्ष घालतो असे आश्वासन दिले आहे.

बैठकीनंतर दै. 'पुढारी'शी बोलताना अमोलराजे जाधव म्हणाले की, ऊस तोडणीचा दर हा वाढून आम्हाला ७०० रुपये प्रति टन मिळावा ही आमची प्रमुख मागणी आहे. तसेच सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाचा शासन निर्णय दिनांक १२ ऑक्टोबर २०२२ नुसार, ऊस तोडणी यंत्राने (हार्वेस्टर) तोडलेल्या ऊसाच्या वजनातून सरसकट ४.५ टक्के पाचटाचे वजन वजावट करण्यास शासन निर्णयाने मान्यता दिली आहे. हा शासन निर्णय हा शेतकऱ्यांच्या ऊसाचे तोडणी व वाहतुक अंतर्गत ऊसाचे वजन वजावट करण्यासंदर्भात आहे.

त्यामुळे ऊस तोडणी यंत्र धारकांच्या बिलातून पाचटासाठी कोणतीही कपात करण्यात येऊ नये, अशा सूचना सर्व साखर कारखान्यांना देण्यात येतील,असे संघटनेस साखर संचालक डॉ केदारी जाधव यांनी पत्र दिलेले आहे. म्हणजेच ऊस पाचट वजावट ही मशीन मालकांकडून करू नये असा शासन निर्णय जाहीर केलेला आहे. पण साखर कारखाने त्याला दात देत नाहीत. ऊस पाचट वजावट ही साडेचार टक्क्यांच्या आसपास आहे.

त्यामुळे या मागण्यांवर जर तात्काळ निर्णय झाला नाही तर संघटना एक नोव्हेंबर पासून सुरु होणाऱ्या यंदाच्या ऊस गाळप हंगामात आपल्या ऊस तोडणी मशीन बंद ठेवतील आणि तोडणीच्या कामकाजात सहभागी होणार नाहीत असे स्पष्ट सांगितलेले आहे. राज्यात सुमारे अडीच हजार ऊस तोडणी मशीन यंत्रे कार्यरत आहेत. तर साधारणत: 180 ते 200 लाख मेट्रिक टन उसाची तोडणी ही यंत्राद्वारे होते असेही जाधव म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT