Sugar Factory Pudhari
पुणे

Sugar Price Hike: सणासुदीत साखरेची आवक वाढविण्यासाठी १५ ऑक्टोबरपासून गाळप सुरू करण्याची तयारी

साखर दरवाढीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाची भूमिका; विस्माकडूनही पुरेसा साठा असल्याचा निर्वाळा

पुढारी वृत्तसेवा

पुणे: देशातील साखरेच्या सध्याच्या दरवाढीचा सहकारी साखर कारखानदारी क्षेत्राला कोणताही फायदा झालेला नाही. संबंधित राज्य सरकारने परवानगी दिल्यास सहकारी साखर कारखाने हे यंदाच्या गाळप हंगामास दिनांक १५ ऑक्टोबर २०२६ पासून हंगाम सुरू करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतील, अशी आमची भूमिका असल्याची माहिती राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी घेतली आहे. ज्याद्वारे ऐन सणासुदीच्या काळातील वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी लवकर उत्पादित झालेली साखर बाजारात उपलब्ध करून देता येईल.

साखरेच्या दरवाढीच्या अचानक निर्माण झालेल्या स्थितीत राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ केंद्र सरकारसोबत खंबीरपणे उभा आहे. ते म्हणाले, लवकर गाळप सुरू केल्यास साखर उताऱ्यात (रिकव्हरी) होणारी घटीची नुकसान भरपाई मिळावी आणि ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२६ मध्ये उत्पादित आणि विक्री होणाऱ्या साखरेवरील जीएसटी कर माफ करावा. साखरेचे उत्पादन खर्च प्रतिकिलो ४३ रुपये असून, केंद्र सरकारने साखरेची किमान विक्री किंमत (एमएसपी) ४३ रुपये प्रतिकिलो घोषित करावी. तसे झाल्यास साखरेच्या साठ्याचे मूल्यांकन वाढून कारखान्यांना अतिरिक्त कर्ज उपलब्ध होईल.

देशातील सहकारी साखर कारखान्यांच्या अडचणींमुळे आर्थिक तरलता कमी असल्याने हंगामपूर्व खर्चासाठी सॉफ्ट लोन देणे आवश्यक आहे. तरच वेळेत गाळप हंगाम सुरू होईल. इथेनॉलमिश्रण प्रकल्पात कोट्यवधींची गुंतवणूक करण्यात आली असून, इथेनॉल खरेदीचे गेल्या चार वर्षांपासून असलेले स्थिर दर आता वाढविण्याची गरज आहे.

साखरेच्या किमती वाढण्यामागे इथेनॉलसाठी होणारा साखरेचा वापर कारणीभूत असल्याच्या नकारात्मक प्रचाराचा आम्ही निषेध करतो. इंधनामध्ये मिश्रणासाठीचे इथेनॉल पुरवठ्यातील साखर उद्योगाचे योगदान ८६ टक्‍क्‍यांवरून कमी होऊन ते २८ टक्‍क्‍यांपर्यंत घसरले आहे. त्यामुळे सध्याच्या साखरेच्या दरवाढीत इथेनॉलचा संबंध असण्याचा प्रश्नच उद्‌भवत नाही.

देशात साखरेचा पर्याप्त व पुरेसा शिलकी साठा: विस्माकडून निर्वाळा

देशात साखरेचा पर्याप्त व पुरेसा साठा कारखान्यांकडे शिल्लक असून, केंद्र सरकारच्या सर्व आदेशांचे पालन वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे (विस्मा) सभासद असलेले खासगी साखर कारखाने करीत आहेत. ऑगस्ट महिन्यात साखरेच्या वाढलेल्या दरस्थितीमध्ये विस्माचे सभासद कारखाने नेहमीप्रमाणे केंद्र व राज्य सरकारच्या निर्देशांचे पालन करतील, असा निर्वाळा विस्माचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे आणि कार्यकारी संचालक अजित चौगुले यांनी दिला आहे. यंदाचा २०२६-२७ चा ऊस गाळप हंगाम ऑक्‍टोबर २०२६ पासून चालू होत आहे. राज्य सरकारच्या मंत्री समितीच्या आदेशानुसार विस्मा सभासद कारखाने कार्यरत राहतील व नवीन हंगामाची अधिकतम उत्पादित नवीन साखर बाजारपेठेत उपलब्ध करतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT