किशोर बरकाले
पुणे: केंद्र सरकारने जुलै महिन्यासाठी 22 लाख टनांचा जाहिर केलेल्या अपुऱ्या कोट्यामुळे साखरेचे दर पंधरवड्यात क्विंटलला तब्बल 600 रुपयांनी वधारुन आजवरची सर्वाधिक उच्चांकी पातळी गाठली आहे. घाऊक बाजारात साखरेचा क्विंटलचा दर 4600 ते 4650 रुपयांवर पोहोचला आहे.
किरकोळ बाजारात साखरेने प्रति किलोस 48 ते 50 रुपयांची पातळी गाठल्याचे सांगण्यात आले. साखरेचा कोटा घोषित झाला त्यावेळी एस् 30 ग्रेड साखरेच्या निविदांचा दर क्विंटलला 3800 ते 3850 रुपये होता.
तो वाढून आजमितीस 4350 ते 4400 रुपयांवर पोहोचला आहे. त्यामुळे साखर निविदाही क्विंटलला 500 ते 550 रुपयांनी वधारल्या आहेत. साखरेच्या भावातील ही तेजी यापुढेही कायम राहण्याचा अंदाज आहे.
साखरेच्या निविदांमधील दरवाढीस पोषक स्थिती निर्माण झाल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. सध्या उत्तरप्रदेश, गुजरात, पश्चिम बंगालसह उत्तरेकडील राज्यांमध्येही साखरेचे दर वधारले आहेत.
'साखर दरात सध्या होत असलेली वाढ ही स्वागतार्ह बाब आहे. साखरेची किमान विक्री किंमत (एमएसपी) वाढवावी, ही साखर उद्योगाची मागणी असून या दरवाढीमुळे त्यास एकारे पुष्टीच मिळते. वाढलेली साखरेची दरपातळी यापुढेही कायम राहणे अपेक्षित आहे. तरच साखर उद्योगास व शेतकऱ्यांना फायदा होईल.- पृथ्वीराज जाचक, अध्यक्ष, श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना, इंदापूर-पुणे.
पुण्याच्या घाऊक बाजारात साखरेचा क्विंटलचा 4600 ते 4650 रुपयांइतका उच्चांकी दर प्रथमच झाला आहे. साखरेच्या वाढत्या दरवाढीस आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने अतिरिक्त दोन लाख टनांचा साखरेचा कोटा खुला करण्याची आवश्यकता आहे.- विजय गुजराथी, साखर व्यापारी, पुणे.