पुणे: येथील घाऊक बाजारात सट्टेबाजांच्या सक्रियतेचा परिणाम म्हणून एस 30 ग्रेड साखरेच्या दरात क्विंटलमागे पुन्हा 50 रुपयांनी वाढ होऊन दर क्विंटललला 5000 ते 5050 रुपयांवर तेजीत स्थिरावले आहेत.
साखरेच्या तेजीला ब्रेक लावण्यासाठी निविदांमधील साखर व्यवहार सात दिवसांत पूर्ण करण्याचे बंधन घालण्याची गरज असून, अतिरिक्त दोन लाख टनांचा कोटा खुला करण्याची मागणी व्यापाऱ्यांकडून होत आहे. त्यावर निर्णय न झाल्यास सणासुदीची मागणी वाढताच साखरेचे दर आणखी वाढण्याचा अंदाज बाजारपेठेतून वर्तविण्यात येत आहे.
गेल्या महिनाभरात एस 30 ग्रेड साखरेचा क्विंटलचा दर एक हजार रुपयाने वाढलेला असून, हे दर उच्चांकी आहेत. साखर निविदांमध्ये सट्टेबाजांचा सक्रिय सहभाग हा तेजीला कारणीभूत ठरलेला आहे.
शिवाय माल खरेदी केल्यानंतर त्यांना प्रत्यक्षात कारखान्यांतून माल उचलून नेण्यास अगदी महिनाभराचा कालावधी कारखान्यांकडून दिला जात आहे. त्यामुळे निविदांमध्ये साखर विक्री होऊनही प्रत्यक्षात बाजारपेठांमध्ये साखरेची पुरवठास्थिती वाढत नाही.
साखरेची खरेदी किरकोळ बाजारात प्रतिकिलोस 55 ते 60 रुपये दराने करण्याची मानसिकता ग्राहकांनी ठेवणे गरजेचे आहे. सोने दरवाढ झाली तर सोन्याला झळाळी आणि साखर दरवाढ झाली तर ती कडू ठरते, हे म्हणणे चुकीचे आहे. वार्षिक प्रतिमाणसी खप 18 ते 20 किलो आहे. त्यामुळे 40 रुपयांची साखर 60 रुपये झाली तर वीस रुपये अधिक दर इतर जीवनावश्यक वस्तूंपेक्षा तसे कमीच आहेत. शेतकऱ्यांच्या उसाला वाजवी दर देऊन साखर उद्योग पुढे नेण्याची कसरत सर्वांनाच करावी लागते. तर, गेली सात ते आठ वर्षे मागणी करूनही केंद्राने साखरेचा किमान विक्री दर क्विंटलला 3100 रुपयेच ठेवला आहे. तो वाढविण्यावर आता गांभीर्याने विचार करून निर्णय घ्यावा, अशी आमची मागणी आहे.पृथ्वीराज जाचक, माजी अध्यक्ष, राज्य सहकारी साखर कारखाना संघ/अध्यक्ष, श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना, इंदापूर, पुणे