Sugar  Pudhari
पुणे

Sugar Price Hike: साखरेच्या दरात तीन दिवसांत क्विंटलमागे ५०० रुपयांची वाढ; किरकोळ दर ६० रुपयांवर

ऑगस्टचा कोटा अपुरा; घाऊक बाजारात एस-३० साखर ५,७०० रुपये क्विंटलवर, अतिरिक्त कोट्याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

पुणे: ऑगस्ट महिन्यासाठी घोषित केलेला साखरेचा कोटा मागणीच्या तुलनेत अपुरा पडत असल्याचे चित्र कायम आहे. त्यामुळे मागील तीन दिवसांत साखरेचे दर क्विंटलला तब्बल ५०० रुपयांनी कडाडले आहेत. घाऊक बाजारपेठेत मंगळवारी एस्‌ ३० ग्रेड साखरेचा क्विंटलचा दर ५७०० रुपये या सर्वोच्च पातळीवर पोहोचला आहे. तर किरकोळ बाजारात साखरेचा प्रति किलोचा दर ५९ ते ६० रुपयांवर पोहोचला आहे.

केंद्र सरकारने ऑगस्टसाठी साखरेचा २२ लाख ५० हजार टन इतका कोटा खुला केलेला आहे. मागणीच्या तुलनेत घोषित केलेला कोटा कमी असल्यामुळे साखरेची सुरू झालेली दरवाढ थांबायला तयार नाही. त्यामुळे साखर दरवाढीला आळा घालण्यासाठी अतिरिक्त दोन लाख टन साखरेचा कोटा खुला करण्याची मागणी होत आहे.

मात्र, केंद्र सरकारकडून या मागणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे साखरेची अव्याहतपणे दरवाढ सुरूच राहिल्याचे चित्र दिसून येत आहे. तशातच सट्टेबाजांची सक्रियता यामुळे तेजीला आणखी उधाण आल्याची माहिती जाणकार व्यापाऱ्यांकडून मिळाली. कारण साखर निविदा क्विंटलला ५५०० रुपयांवर पोहोचल्या आहेत.

त्यामुळे अशीच स्थिती राहिल्यास दरवाढीला ब्रेक लावणे अवघड होण्याची शक्यता आहे. वास्तविक पाहता ऑगस्ट महिन्यातील उर्वरित १३ दिवस आणि सप्टेंबर आणि ऑक्टोबर हे दोन महिने पाहता अडीच महिन्यानंतर यंदाचा २०२६-२७ मधील ऊस गाळप हंगाम सुरू होत आहे.

...तर साखरेचा पुरवठा वाढू शकतो

देशात उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील कारखान्यांकडे अन्य राज्यांच्या तुलनेत साखरेचा पुरेसा साठा असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे विशेषतः या दोन्ही राज्यांतील कारखान्यांना प्रत्येकी एक लाख टनाचा अतिरिक्त कोटा तत्काळ खुला केल्यास बाजारात साखरेचा पुरवठा तत्काळ वाढू शकतो. त्यामुळे किमान वाढत्या दराला आळा बसून ते स्थिरावण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे केंद्र सरकार आता साखर दरवाढीला ब्रेक लावण्यावर कोणता निर्णय घेणार, याकडे साखर वर्तुळाचे लक्ष लागलेले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT