पुणे : देशात यंदाचा 2025-26 च्या ऊसगाळप हंगामाने आता वेग पकडला असला तरी उद्योगाच्या ज्वलंत प्रश्नांवरील निर्णय अद्याप प्रलंबित असल्याने संदिग्धता कायम आहे.
त्यामध्ये साखरेच्या किमान विक्री दरात (एमएसपी) प्रतिक्विंटलला 3100 वरून 4100 रुपयांपर्यंत वाढ करणे आणि इथेनॉलचे खरेदी दर वाढविण्यावर केंद्राकडून कोणतेच सूतोवाच नसल्यामुळे साखर उद्योगाच्या नजरा धोरणात्मक निर्णय होणार की नाही, याकडे लागल्याचे सांगण्यात आले साखर दराची फेररचना करण्याचा (एमएसपी) निर्णय दीर्घकाळ प्रलंबित आहे. त्यामुळे संपूर्ण साखर क्षेत्राला अजूनही अनिश्चिततेचा सामना करावा लागत असल्याचे नवी दिल्ली येथील राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने म्हटले आहे.
गेल्या सहा वर्षांत वाढलेला उत्पादन खर्च, अप्रत्यक्ष अतिरिक्त खर्च, साठवणूक खर्च, व्याजाचे वाढणारे ओझे यामध्ये लक्षणीय वाढ झाली असली तरी साखरेच्या किमान विक्री दरात केंद्र सरकारकडून कोणताही बदल करण्यात आलेला नाही. सध्याच्या किमान साखर विक्रीदरात विनाविलंब आणि तातडीने वाढ करणे आवश्यक असून साखरेचा दर प्रतिक्विंटलला 4100 रुपये करण्यात यावा.
बाझील आणि थायलंडसारख्या प्रमुख ऊस उत्पादक देशांमध्ये शेतकऱ्यांना दिला जाणारा महसूलचा वाटा सुमारे हास 60 ते 65 टक्के आहे. ज्यामध्ये कोणतीही एफआरपी नसल्याची माहिती राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी कळविली आहे. महाराष्ट्र, कर्नाटक सरकारने कारखान्यांना वाढीव महसूल शेतकऱ्यांसोबत वाटून घेण्याचे विधेयक संमत केले आहे, असे त्यांनी सांगितले.
देशात यंदा 350 लाख टन साखर उत्पादन अपेक्षित असून त्यापैकी सुमारे 35 लाख टन साखर इथेनॉलकडे वळविल्यानंतर केवळ साखरेचे निव्वळ उत्पादन 315 लाख टन होईल. साखरेची हंगामपुर्व आरंभीचा शिलकी साठा 50 लाख टन आहे. त्यातून देशांतर्गत वार्षिक साखरेचा खप 290 लाख टन विचारात घेता 75 लाख टन साखर शिल्लक राहील.
केंद्राने नुकतीच 15 लाख टन साखर निर्यातीस परवानगी दिली आहे. त्यामध्ये उपलब्ध राहणारा संभाव्य अतिरिक्त साखर साठ्यामुळे मोठ्या प्रमाणात पैसा अडकून पडेल व घेतलेल्या कर्जावर व्याज वाढत जाईल. साखर उद्योगाचे अर्थ चक्र सुरळीत चालण्यासाठी अतिरिक्त 10 लाख टन साखर निर्यातीस परवानगी देण्याची मागणी साखर महासंघाने केंद्राकडे केल्याचे पाटील यांनी म्हटले आहे.
देशात दिनांक 30 नोव्हेंबरपर्यंत 486 लाख टन उसाचे गाळप पूर्ण झाले असून त्यातून 41 लाख 35 हजार टनाइतके साखरेचे नवे उत्पादन हाती आले आहे. गतवर्षी याच काळात 334 लाख टन ऊस गाळप पूर्ण होऊन 30 नोव्हेंबरअखेर 27 लाख 60 हजार टनाइतके साखर उत्पादन झाले होते. नोव्हेंबर अखेरपर्यंत साखरेचा सरासरी उतारा 8.51 टक्के असून जो गतवर्षी याच दिवशी 8.27 टक्के होता.प्रकाश नाईकनवरे, व्यवस्थापकीय संचालक, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ, नवी दिल्ली.