साखर कारखान्यांना अनेक अडचणी भेडसावू शकतात: वळसे पाटील Pudhari
पुणे

Sugar Mills Challenges| साखर कारखान्यांना अनेक अडचणी भेडसावू शकतात: वळसे पाटील

भविष्यकाळात साखर कारखान्यांना अनेक अडचणी भेडसावू शकतात.

पुढारी वृत्तसेवा

मंचर: राज्यभरात अनेक सहकारी व खासगी साखर कारखान्यांची परिस्थिती खराब असून आजच्या तारखेपर्यंत अनेक कारखान्यांनी ‘एफआरपी’ ची रक्कम सुद्धा दिलेली नाही. भविष्यकाळात साखर कारखान्यांना अनेक अडचणी भेडसावू शकतात.

या अडचणींना आपल्याला तोंड द्यायचे असल्याने भीमाशंकर साखर कारखान्याकडे असलेला सर्व पैसा वाटून टाकला तर भविष्यात येणार्‍या अडचणींना तोंड कसे देणार,असा प्रश्न माजी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी गुरुवारी (दि.4) उपस्थित केला. (Latest Pune News)

पारगाव दत्तात्रयनगर (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याची 29वी वार्षिक सभा खेळीमेळीच्या वातावरणात झाली. यावेळी दिलीप वळसे पाटील बोलत होते. वळसे पाटील म्हणाले, आपल्या शेजारील घोडगंगा सहकारी साखर कारखाना बंद पडला आहे. जिल्ह्यातील व राज्यातील अनेक कारखान्यांना ‘एफआरपी’ रक्कम देता आली नाही. साखर आयुक्तांनी ‘एफआरपी’ ची रक्कम शेतकर्‍यांना दिल्याशिवाय यावर्षी कारखाना सुरू करण्यास परवानगी देणार नाही, अशा सूचना दिल्या आहेत.

आपण ही परिस्थिती समजून घेणे गरजेचे आहे. देश पातळीवर पाहिले तर देशात उसाची लागवड कमी झाली आहे. मागील वर्षी पाऊस कमी झाला पण ऊस मिळाला. यावर्षी पाऊस चांगला आहे परंतु ऊस लागवडीचे प्रमाण घटले आहे.

राज्यातील विविध सहकारी आणि खासगी कारखान्यांने त्यांची गाळप क्षमता वाढवत आहेत. कमी दिवसात जास्त गाळप करणे हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून कारखाने काम करत आहेत. कमी दिवसात जास्त उसाचे गाळप झाल्यास ज्या कारखान्यांची गाळप क्षमता कमी आहे, त्यांना ऊस मिळणे अवघड होईल व त्या कारखान्यांवर संकट येईल.

कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे म्हणाले कारखान्याचे संस्थापक संचालक दिलीप वळसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याची वाटचाल दमदारपणे चालू आहे. आजूबाजूचे साखर कारखान्यांची अवस्था दयनीय झाली आहे. त्या तुलनेत भीमाशंकरची वाटचाल आर्थिक दृष्ट्या खूप चांगली आहे.

सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे आणि कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे यांनी दिली. अहवाल वाचन कारखान्याचे कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. सुदाम खिलारी, नीलेश पडवळ. तर आभार कारखान्याचे उपाध्यक्ष अ‍ॅड. प्रदीप वळसे पाटील यांनी मानले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT