

भामा आसखेड: पाईट (ता. खेड) नजीकच्या कुंडेश्वर येथील अपघातात मृत पावलेल्या बारा महिलांच्या नातेवाइकांना राज्य शासनाकडून प्रत्येकी पाच लाख रुपये मिळाले आहेत. केंद्र सरकारचे दोन लाख रुपये देखील वारसांच्या बँक खात्यावर लवकरच वर्ग होणार आहेत.
एकंदरीत, मृतांच्या नातेवाइकांना एकूण 7 लाख रुपये मिळणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विशेष कार्य अधिकारी दिगंबर रौंधळ यांनी ही माहिती दिली. याबाबतची बातमी दै. ‘पुढारी’ने प्रसिद्ध केली होती. (Latest Pune News)
कुंडेश्वर डोंगर येथे 11 जुलै रोजी झालेल्या पिकअपच्या अपघातात बारा महिलांचा मृत्यू झाला होता. राज्य सरकारने अपघातातील मृत महिलांच्या वारसांना चार लाख रुपयांची आणि केंद्र सरकारने देखील दोन लाखांची मदत जाहीर केली होती. पवार यांचे विशेष कार्य अधिकारी रौंधळ हे पाईटचे असल्याने त्यांनी पवार यांना अपघातातील मृतांच्या कुटुंबाबाबत माहिती दिली. पवार यांनी चारऐवजी पाच लाख रुपये मदत करावी, असा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडला. त्यानुसार निर्णय झाला.
अपघात घडल्यानंतर शासन निर्णयाप्रमाणे राज्य सरकारने मृत महिलेच्या नातेवाइकांना चार लाखांच्या धनादेशाचे वाटप करण्याचे आदेश महसूल अधिकार्यांना दिले. त्यानुसार चार लाख मिळाले. त्यानंतर रौंधळ यांनी पाच लाख देण्याचा निर्णय झाला असून, तसे वृत्त दै. ‘पुढारी’त आल्याचे सचिवस्तरावरील अधिकार्यांना सांगितले.
त्यानंतर मृत महिलेच्या वारसांना एक लाख मिळाले. अपघातात मृत्यू झालेल्या प्रत्येक महिलेच्या नातेवाइकांना प्रत्येकी पाच लाखांप्रमाणे मदत मिळाली आहे. केंद्र सरकारकडून देखील प्रत्येकी दोन लाख रुपये मिळत आहेत. एकंदरीत, राज्य व केंद्र सरकारचे मिळून मृत महिलांच्या वारसांना एकूण 84 लाख रुपयांची मदत मिळाली आहे.
याबाबत रौंधळ म्हणाले की, सरकारने पहिल्यांदा चार लाखांची घोषणा केली. परंतु, पवार यांनी पाच लाख देण्याचा निर्णय मंत्रिमंडळात लावून धरला. त्यानुसार दै. ‘पुढारी’त बातमी प्रसिद्ध झाली. निर्णयानुसार लगेच चार लाख मिळाले. परंतु, एक लाख मिळण्याला अडचणी आल्यावर आलेली बातमी थेट अधिकार्यांना पाठविण्यात आली. त्यानंतर एक लाख देण्याचा निर्णय झाला.