बारामती: समाजमाध्यमांद्वारे महिलेला जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकाशी बोलण्यास भाग पाडत पुढे त्याला नग्न होण्यास भाग पाडत हे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत त्याच्याकडून 1 लाख 15 हजार रुपयांची खंडणी घेणार्या दोघांना वडगाव निंबाळकर पोलिसांनी अटक केली. या घटनेमुळे बारामती तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली होती.
संबंधित शिक्षक बारामती तालुक्यातील एका शाळेवर कार्यरत आहे. पंचायत समितीने त्यांच्याकडे केंद्रप्रमुखाचा पदभार दिला आहे. मे 2025 ते ऑगस्ट 2025 या कालावधीत त्यांना फेसबुक, इन्स्टाग्रामवर एका महिलेच्या नावाने फ्रेंड रिक्वेस्ट पाठविण्यात आली होती. त्यांनी ती स्वीकारल्यावर पुढे व्हाट्स अॅपवर चॅट सुरू झाले. एका महिलेने त्यांना व्हिडीओ कॉल केला. (Latest Pune News)
तिने स्वतः कपडे उतरवत या शिक्षकाला तसे करण्यास भाग पाडले होते. पुढे अभिषेक विठ्ठलराव पांचाळ (वय 24, रा. नवी आबादी देगलूर रोड उदगीर, ता. उदगीर, जि. लातूर) व सिद्धांत महादेव गगनभिडे (वय 25, रा. पाटोदा बुद्रुक, ता. जळकोट, जि. लातूर) या दोघांनी व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी शिक्षकाला दिली होती.
तसेच ते व्हायरल करायचे नसतील तर आम्हाला पैसे द्या अशी मागणी केली होती. भितीपोटी शिक्षकाने 1 लाख 15 हजार रुपयांची खंडणी त्यांनी दिली होती. परंतु त्यांच्याकडून पैशाची वारंवार मागणी होऊ लागल्याने अखेर त्यांनी पोलिसांत फिर्याद दिली होती.
पोलिसांनी या दोघांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 308(2), 308(3), 308(4), 308(5), 352, 351(2), 351(3), 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर या दोघांना तत्काळ अटक करण्यात आली. या दोघांनी महिलेच्या नावे खोटे खाते सुरू केल्याचे तपासात पुढे आले. गुन्ह्यात वापरलेला मोबाईल, दुचाकी जप्त करण्यात आली. सहाय्यक पोलिस निरीक्षक नागनाथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राहुल साबळे या घटनेचा तपासकरीत आहेत.
समाजमाध्यमाचा वापर करताना नागरिकांनी भान राखणे गरजेचे आहे. समाजमाध्यमाद्वारे अशा प्रकारच्या घटना अलिकडील काळात सातत्याने घडत आहेत. नागरिकांनी ब्लॅकमेलिंगला बळी न पडता तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा.
- नागनाथ पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक, वडगाव निंबाळकर