पुणे: राज्यातील यंदाच्या २०२६-२७ या हंगामासाठी ऑनलाइन गाळप परवाना अर्ज दि. १ सप्टेंबरपासून सादर करण्याच्या सूचना साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांनी जारी केल्या आहेत. सर्व सहकारी व खासगी साखर कारखान्यांनी गाळप परवाना प्राप्त करून घेतल्याशिवाय हंगाम सुरू करू नये.
कारखान्याने मागील हंगामातील उसाचे बिल (एफआरपी) संपूर्ण शंभर टक्के दिले असले पाहिजे. ऑनलाइन गाळप परवाना अर्ज दिलेल्या मुदतीत सादर न करणे, गाळप परवाना प्राप्त करून न घेताच ऊस गाळप सुरू करणे, गाळप परवान्यांच्या अटींचे पालन न केल्यास संबंधित साखर कारखान्यांवर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
केंद्राचा ऊस नियंत्रण आदेश १९६६ आणि राज्य सरकारचा महाराष्ट्र साखर कारखाने (क्षेत्र आरक्षण आणि गाळप व ऊसपुरवठा नियम) आदेश, १९८४ मधील तरतुदीनुसार साखर कारखान्यांनी परवाना अधिकाऱ्यांनी गाळप परवाना दिल्याशिवाय साखर उत्पादन करता येणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री समितीच्या बैठकीत होणाऱ्या निर्णयानुसार यंदाचा गाळप हंगाम सुरू करण्याचा दिनांक निश्चित होईल. त्यानुसार यंदाच्या हंगामासाठी गाळप परवाना अर्ज दि. १ सप्टेंबर ते ३० सप्टेंबरपर्यंत ऑनलाइनद्वारे स्वीकारले जातील.
गाळप परवाना प्रस्ताव ऑनलाइन भरणा करण्यासाठी कारखान्यांनी लॉगिन आयडी व पासवर्ड वापरून http://rushinglic.mahasugar.co.inogin.aspx या वेबसाईटवर आपला ऑनलाइन गाळप परवाना दि. १ सप्टेंबरपासून सादर करावा. त्यासाठी गाळप परवाना फी, गाळप सुरक्षा अनामत रक्कम, मुख्यमंत्री साहाय्यता निधी, लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ निधी व साखर संकुल निधीबाबत उच्च न्यायालयात प्रकरण प्रलंबित असल्याने याबाबत यथावकाश कळविण्यात येईल.
राज्यात यंदाच्या २०२६-२७ च्या हंगामात सुमारे १२ लाख हेक्टरवर ऊस पीक उभे आहे. त्यातून ऊस बेणे, रसवंती, गुऱ्हाळे आदींना जाऊन प्रत्यक्षात गाळपासाठी १००० ते १०५० लाख मेट्रिक टन उसाची उपलब्धता आणि सुमारे ९५ ते १०० लाख मे. टन साखर उत्पादन अपेक्षित आहे. यंदा क्षेत्र अधिक दिसून येत असले तरी खोडवा उसाचे प्रमाण अधिक असल्याचे साखर कारखान्यांच्या आढावा बैठकीतून समोर आले आहे. त्यामुळे उतारा आणि उत्पादन तुलनेने कमी अपेक्षित राहते. गतवर्षीचा २०२५-२६ च्या हंगामाप्रमाणेच यंदाचा नियमित हंगाम राहण्याची अपेक्षा आहे.महेश झेंडे, साखर सहसंचालक (विकास), साखर आयुक्तालय, पुणे.