पुणे

सर्वपक्षीय कारखानदारांचे तोंड ‘गोड’! कर्ज मंजुरीसाठी10 साखर कारखान्यांचे प्रस्ताव मंत्रालयात

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : केंद्र सरकारच्या राष्ट्रीय सहकार विकास निगमकडून (एनसीडीसी) राज्य शासनामार्फत कर्ज मिळण्यासाठी 10 साखर कारखान्यांचे सुमारे 1 हजार 132 कोटींचे प्रस्ताव साखर आयुक्तालयाने मंजुरीसाठी मंत्रालयात पाठविले आहेत. त्यामध्ये सर्वपक्षीय नेत्यांचा समावेश आहे. आयुक्तालय स्तरावर तीन साखर कारखान्यांच्या प्रस्तावांची छाननी बाकी असल्याचे सांगण्यात आले.

साखर कारखान्यांनी प्रामुख्याने शेतकर्‍यांच्या उसाची रास्त आणि किफायतशीर किंमत (एफआरपी) देणे, कामगारांची थकीत देणी देणे, गाळप हंगाम सुरु करण्यासाठीची रक्कम उपलब्धता आणि ऊस तोडणी वाहतुकीच्या रकमेसाठी एनसीडीसीकडून कर्ज मिळण्याची मागणी प्रस्तावाद्वारे केलेली आहे. त्यामध्ये साखर आयुक्तालय स्तरावर 10 साखर कारखान्यांच्या प्रस्तावांची छाननी होऊन कर्जमंजुरीसाठी ते मंत्रालय स्तरावर पाठविण्यात आले आहेत.

पुणे जिल्ह्यातील दोन साखर कारखान्यांमध्ये प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाचे आमदार अशोक पवार यांच्या रावसाहेब पवार घोडगंगा सहकारी साखर कारखाना,शिरुर (पुणे) 107.69 कोटी, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वर्चस्व असलेल्या इंदापूरमधील छत्रपती सहकारीचे 140 कोटी कर्ज मागणीचा प्रस्ताव आहे. सोलापूरमधील माजी आमदार धनाजी साठे यांच्यांशी संबंधित श्री संत कुर्मदास सहकारीचे 59.70 कोटी, सोलापूरमधील कल्याणराव काळे यांच्या संत शिरोमणी वसंतराव काळे सहकारीचे 146.32 कोटी,

अहमदनगरमधील आप्पासाहेब राजळे व आमदार मोनिक राजळे यांच्या वृध्देश्वर सहकारीचे 99.07 कोटी, अहमदनगरमधील अगस्ती सहकारीचे 75 कोटी, नगरमधील लोकनेते मारुतराव घुले ज्ञानेश्वर सहकारीचे 100 कोटी, बीडमधील जय भवानी सहकारीचे 150 कोटी, आमदार प्रकाश सोळुंके यांच्या बीडमधील माजलगांव येथील सुंदरराव सोळुंकेचे 104.18 कोटी, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नांदेडमधील भाऊराव चव्हाण सहकारी (युनिट 1) 150 कोटी मिळून एकूण 1 हजार 131 कोटी 96 लाख रुपयांच्या कर्जमागणी प्रस्तावांचा समावेश आहे. आयुक्तालय स्तरावर सोलापूरमधील संत दामाजी सहकारी (75 कोटी), अहमदनगरमधील कुकडी (100 कोटी), सोलापूरमधील स्वामी समर्थ सहकारी (50 कोटी) मिळून 225 कोटी रुपयांच्या कर्ज मागणीच्या प्रस्तावांच्या छाननी सुरु असल्याचे सांगण्यात आले.

भाजपच्या पाच नेत्यांच्या कारखान्यांना कर्ज वितरित

माजी खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांच्या माळशिरस (जि.सोलापूर) येथील श्री शंकर सहकारी साखर कारखान्यास 113 कोटी 42 लाख रुपये, खासदार धनंजय महाडिक यांच्या सोलापूरमधील भिमा टाकळी सहकारीस 126 कोटी 38 लाख रुपये, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या पुणे जिल्ह्यातील 2 साखर कारखान्यांमध्ये इंदापूर कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारीस 150 कोटी आणि निरा भिमा सहकारीस 75 कोटी, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या जालना येथील श्री रामेश्वर सहकारीस 34 कोटी 74 लाख रुपयांचे मंजूर झालेले कर्ज वितरित करण्यात आले आहे. तर भाजप आमदार अभिमन्यू पवार यांच्या लातूर येथील शेतकरी सहकारी साखर कारखान्यास 50 कोटी लवकरच वितरित होत असल्याची माहितीही अधिकार्‍यांनी दिली.

एनसीडीसीकडून राज्य शासनामार्फत 5 साखर कारखान्यांच्या कर्ज मंजुरीचे 499 कोटी 54 लाख रुपये वितरित करण्यात आले आहेत. राज्य सरकारच्या हमीवर सहकारी साखर कारखान्यास देण्यात येत असलेल्या कर्जाचा व्याजदर 9.46 टक्के इतका आहे. त्यादृष्टिने प्राप्त 10 प्रस्तावांची छाननी पूर्ण होऊन पुढील कर्जमंजुरीच्या निर्णयासाठी ते मंत्रालयात पाठविण्यात आले आहेत. मंजूर कर्ज रक्कम, नवे मंजुरीचे प्रस्ताव आणि छाननी कर्ज मंजुरी प्रस्ताव विचारात घेता कर्जाची एकूण रक्कम 1 हजार 900 कोटी रुपये होते.

– यशवंत गिरी, साखर संचालक (अर्थ), साखर आयुक्तालय, पुणे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT