ऊस लागवडीच्या क्षेत्रात मोठी घट Pudhari File Photo
पुणे

Sugar Factory News: यंदाच्या गळीत हंगामात होणार उसाची पळवापळवी; सर्वच साखर कारखान्यांना कमतरता जाणवणार

येत्या 2025-26 च्या गळीत हंगामाला साखर कारखान्यांना ‘गेटकेन’ उसासाठी मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे

पुढारी वृत्तसेवा

सुरेश वाणी

नारायणगाव : गेल्या वर्षी पाऊस कमी झाल्याने ऊस लागवडीच्या क्षेत्रात मोठी घट झाली आहे. लागवड केलेल्या उसाचा खोडवा शेतकर्‍यांनी काढून टाकल्याने येत्या 2025-26 च्या गळीत हंगामाला साखर कारखान्यांना ‘गेटकेन’ उसासाठी मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे. एवढेच नाही, तर गाळप हंगामाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कार्यक्षेत्राबाहेर उसाची पळवापळवी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. (Pune News Update)

उसाचे क्षेत्र कमी होण्यासह एकरी उत्पादनदेखील कमी होत असल्याचे निदर्शनात येत आहे. क्षारपड जमीन झाल्याने तसेच वारंवार जमिनीमध्ये एकच उसाचे पीक घेतल्याने उसाचे वजन घटू लागले आहे. लागवडीच्या व खोडवा उसाचे सरासरी वजन देखील कमी होऊ लागले आहे. साखर कारखान्यांना आडसली, पूर्वहंगामी, सुरू व खोडवा अशा स्वरूपात उसाचा पुरवठा होत असतो. साधारण 14 ते 15 महिन्यांचा ऊस तोडल्यावर त्या उसाचा साखर उतारादेखील चांगला पडतो.

दरम्यान, यंदाच्या वर्षी सगळ्याच कारखान्यांना गळीत हंगामासाठी पुरेसा ऊस नसल्याने आजूबाजूच्या परिसरातून ‘गेटकेन’ ऊस मिळतोय का? याबाबतचे प्रयत्न करावे लागणार आहेत. एवढेच नाही तर ‘गेटकेन’ ऊस देणार्‍या शेतकर्‍यांना साखर कारखान्यांना पायघड्या घालाव्या लागणार आहेत.

शिरूर तालुक्यामध्ये उसाचे क्षेत्र जास्त असल्याने व घोडगंगा सहकारी साखर कारखाना बंद असल्याने बहुतांशी साखर कारखान्यांचा या भागातील शेतकर्‍यांच्या उसावर डोळा आहे. साखर कारखान्यांचा गळीत हंगाम संपला की सगळेच कारखाने शिरूरच्या शेतकर्‍यांच्या भेटी घेऊन खोडवा उसाची नोंद आमच्याकडे करा, आमच्याकडून उसाचे बियाणे घेऊन लागवडीची नोंद आमच्याकडे करा अशी विनंती करत फिरत आहेत. सभासद शेतकर्‍यांनाही त्या कारखान्याला वीस गुंठे क्षेत्रातील ऊस द्या व बाकीचा ऊस आम्हाला द्या अशीही गळ घालण्याचा प्रयत्न सुरू आहे, एवढेच नाही तर शिरूर भागामध्ये आपल्या कारखान्याचे शेतकी कार्यालय थाटून आपल्याकडे जास्त ऊस वळवण्याचा प्रयत्न सुरू देखील काही कारखान्यांनी सुरू केला आहे.

मागील गळीत हंगामामध्ये उसाचे क्षेत्र अधिकचे असल्याने व शासनाच्या धोरणानुसार साखर कारखाने उशिरा सुरू झाल्याने ऊसतोडणी वेळेवर होत नव्हती. उसाला 18- 19 महिने झाले तरी मागील वर्षी शेतकर्‍यांचा ऊस तुटत नव्हता. यंदा मात्र या उलट परिस्थिती सगळीकडे पाहायला मिळणार आहे. अनेक साखर कारखान्यांनी ऊस गाळप करण्याची क्षमता वाढविली आहे.

तसेच अगोदरच उसाचे क्षेत्र घटले आहे आणि कार्यक्षेत्रामध्ये कारखान्याला पुरेसा ऊस उपलब्ध नसल्याने उसाची तोडणी तर वेळेवर होईलच शिवाय कार्यक्षेत्राबाहेरचा जास्तीचा ऊस आपल्यालाच कसा मिळेल याबाबतचा खास प्रयत्न राहणार आहे.

पुणे जिल्ह्यामध्ये खासगी कारखानेदेखील अधिकचे वाढले असून त्यांच्याकडूनही उसाला चांगला बाजारभाव मिळत असल्याने व उसाची तोडणी वेळेत व्हावी म्हणून शेतकर्‍यांचा कल खासगी कारखान्यांकडे देखील वाढू लागला आहे. ’गेटकेन’चा ऊस मिळवण्यासाठी जो कारखाना उसाला जास्तीचा बाजारभाव देईल त्याच कारखान्यांना हा ऊस जास्त मिळू शकतो. जास्तीचा बाजारभाव ’गेटकेन’ उसाला कसा द्यायचा? याचाही विचार साखर कारखान्यांना गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वीच करावा लागणार आहे. एकंदरीत 2025- 26 च्या गळीत हंगामात ऊस पळवापळवीचे प्रमाण अधिक वाढू शकते व कार्यक्षेत्राबाहेर असलेल्या ऊस उत्पादक शेतकर्‍यांचे महत्त्व वाढू शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT