पुणे : शहरातील सार्वजनिक वाहतुकीचा कणा असलेल्या पीएमपी प्रशासनाने प्रवासी भाडेदरात लक्षणीय वाढ केली आहे. प्रशासनाच्या या निर्णयाला प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाची देखील मंजुरी मिळाली असून, उद्यापासून (दि. 1 जून) नव्या दरानुसार भाडे आकारणी केली जाणार आहे. त्यामुळे आता पुणेकरांना पीएमपीमधून प्रवास करताना जादा पैसे मोजावे लागणार आहेत.
पीएमपीच्या मुख्य कार्यालयात दि. 12 मे रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत सुधारित भाडेदराला मंजूरी देण्यात आली होती. आता प्राधिकरणाची मंजुरी मिळाल्याने नवे दर लागू होणार आहेत. नव्या दरानुसार प्रवासी तिकिटे, स्टेज रचना (टप्प्यानुसार) आणि पास दरात बदल करण्यात आला असून, यामुळे प्रवाशांच्या खिशावर अधिकचा भार पडणार आहे. यापुर्वी प्रशासनाने डिसेंबर 2014 मध्ये भाडेवाढ केली होती. त्यानंतर आता अकरा वर्षानंतर भाडेवाढ केली आहे. नवीन दररचनेनुसार, 1 ते 5 किमी अंतरासाठी आता 10 रुपये मोजावे लागणार आहेत. पुर्वी पहिल्या दोन किलोमीटरसाठी 5 रुपयांचे तिकीट मिळत होते.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड मनपा हद्दीसाठीचे वेगवेगळे दैनिक व मासिक पास रद्द करून एकत्रित पास प्रणाली लागू करण्यात आली आहे. यानुसार, एकत्रित दैनिक पास 70 रुपये आणि मासिक पास 1 हजार 500 रुपये इतका करण्यात आला आहे. पुर्वी एका महापालिका हद्दीसाठी 40 रुपयांचा दैनिक पास होता. पीएमआरडीए हद्दीसाठीचा दैनिक पास 120 रुपयांवरून 150 रुपयांवर नेण्यात आला आहे. मात्र, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांसाठीच्या सवलतींच्या पासेसमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
या निर्णयामुळे सर्वसामान्य पुणेकरांना आता आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे. आजवर पहिल्या टप्प्यासाठी 5 रुपयांचे किमान तिकीट मिळत होते. हे तिकीट आता कालबाह्य झाले असून, किमान तिकीट 10 रुपयांचे घ्यावे लागणार आहे.