पुणे : चेहर्यावरचा रंग उजळवून चमक आणण्यासाठी घेतलेल्या सौंदर्यप्रसाधनांच्या इंजेक्शनचे तब्बल नऊ लाखांचे बिल एका वरिष्ठ अधिकार्याकडून महापालिकेच्या माथी मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे समोर आले आहे. मात्र, हे बिल दिले गेले तर त्यावरून बोंबाबोंब होण्याची भीती असल्याचे आरोग्य विभागाने निदर्शनास आणून दिल्यानंतर हे बिल मागे घेण्यात आले. (Pune News Update)
प्रशासक राजवटीत महापालिकेच्या गैरकारभाराने कळस गाठला आहे. वरिष्ठ अधिकारीच नियम धाब्यावर ठेवून निर्णय घेत आहेत. त्यातच आता महापालिकेच्या एक वरिष्ठ अधिकार्यासह त्याच्या कुटुंबीयांनी चेहर्यावरचा रंग उजळविण्यासाठी घेतलेल्या उपचारांचे नऊ लाखांचे बिलही महापालिकेकडून देण्याचा प्रयत्न केला होता, असे समोर आले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या वरिष्ठ अधिकार्यासह त्याच्या पत्नी व मुलीने चेहर्याचा रंग उजळविण्यासाठी घेतले जाणारे ‘ग्लुटा थिओन’ इंजेक्शन घेतले. या एका इंजेक्शनची किंमत तब्बल 50 ते 60 हजार इतकी आहे.
या अधिकार्यासह त्याच्या पत्नी व मुलीने प्रत्येकी पाच ते सहा इंजेक्शन घेतली आहेत. त्यांची प्रत्येकी तीन लाखांची बिले अशी एकूण नऊ लाखांच्या रक्कमेची बिले अंशदायी उपचार योजनेंतर्गत महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे दाखल केली होती. मात्र, अशा पद्धतींच्या उपचारांची बिले महापालिका देत नाही, ही बिले दिली गेली तर त्यावरून आरडाओरड होऊन अडचण निर्माण होऊ शकते, असे आरोग्य विभागाकडून संबंधित अधिकार्याच्या निदर्शनास आणण्यात आले. त्यामुळे नाईलाजास्तव हे बिल संबंधित अधिकार्याने मागे घेतले असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.