पुणे : पुढारी वृत्तसेवा
मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (व्हीएसआय) मुख्यालयात 4 व 5 जून रोजी राज्यस्तरीय साखर परिषद होत आहे. या परिषदेत साखर उद्योगाला भेडसावत असणार्या ज्वलंत समस्या, त्यावरील उपाययोजना, तसेच भविष्यातील आव्हाने यावर सखोल मार्गदर्शन व चर्चा होणार आहे.
व्हीएसआय, साखर आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ आणि वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (विस्मा) यांच्या संयुक्त विद्यमाने या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून, अध्यक्षस्थानी शरद पवार आहेत. परिषदेसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय सहकार सचिव ज्ञानेश कुमार उपस्थित राहणार आहेत.
या परिषदेत व्हीएसआयतर्फे साखर उद्योगातील सर्वोत्कृष्ट कार्यक्षमतेसाठी दिल्या जाणार्या सन 2019-20 व सन 2020-21 मधील पुरस्कारांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. 4 जून रोजी सकाळी साडेनऊ वाजता परिषदेचे उद्घाटन होईल. त्यानंतर 'आधारस्तंभ' या शरद पवार यांच्या साखर उद्योगातील योगदानावर आधारित पुस्तकाचे प्रकाशन गडकरी यांच्या हस्ते होईल.
उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह अनेक सहकारी व खासगी कारखान्यांचे अध्यक्ष उपस्थित राहणार आहेत. सकाळी साडेअकरा वाजता 'साखर उद्योगासमोरील समस्या व उपाययोजना' या सत्राचे अध्यक्षस्थान अजित पवार भूषविणार आहेत. सहकारी साखर कारखान्यांच्या उत्पन्नाचे स्त्रोत वाढविण्यावर श्री रेणुका शुगर्सचे संचालक रवी गुप्ता, राज्यातील साखर उद्योगासाठी प्रशासकीय सुधारणा या विषयावर साखर आयुक्त शेखर गायकवाड, राज्य आणि केंद्राकडून साखर उद्योगासाठी प्रशासकीय सुधारणा या विषयावर राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे मार्गदर्शन करणार आहेत.
दुसर्या सत्रात साखर उद्योगात भविष्यातील नावीन्यपूर्ण संशोधन, तंत्रज्ञान व उपयोगिता यांचा वेध व स्वीकार यावर चर्चा, तर तिसरे सत्र कृषी व तांत्रिक सत्राचे असेल. 5 जून रोजी चौथे सत्र कृषी सत्र व तांत्रिक सत्र असेल. कृषी विद्यापीठांचे कुलगुरू विविध विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. सायंकाळी तीन ते पाच या वेळेत शरद पवार यांच्या हस्ते पारितोषिक वितरण होईल.