पुणे

Jejuri : जेजुरीत देवसंस्थानकडून सोमवती यात्रेची जय्यत तयारी

अमृता चौगुले
जेजुरी : पुढारी वृत्तसेवा :  महाराष्ट्राचे कुलदैवत असणार्‍या जेजुरीच्या खंडोबा देवाचा धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचा असणारा सोमवती यात्रा पालखी सोहळा सोमवार, दि. 13 नोव्हेंबर रोजी होत आहे. सकाळी 7 वाजता देवाची पालखी गडावरून कर्‍हा नदीकडे प्रस्थान ठेवणार आहे. तर दुपारी 12 ते 1 च्या दरम्यान नदीवर देवाला कर्‍हा स्नान घालण्यात येणार असल्याचे देवाचे इनामदार व मानकरी राजेंद्र पेशवे यांनी सांगितले. महाराष्ट्राचे कुलदैवत असणार्‍या जेजुरीच्या खंडोबा देवाच्या वर्षाकाठी 8 यात्रा भरतात. सोमवारी अमावस्येला सोमवती यात्रा भरते. या सोमवती यात्रेला धार्मिक महत्त्व आहे.
या यात्रेसाठी सुमारे 4 ते 5 लाख भाविक येत असतात. या यात्रेच्या नियोजनासाठी गुरुवारी (दि. 9) श्रीखंडोबा पालखी सोहळा खांदेकरी, मानकरी व ग्रामस्थांची बैठक ऐतिहासिक छत्री मंदिर परिसरात पार पडली. या वेळी पेशवे बोलत होते. या वेळी तहसीलदार व देवसंस्थानचे पदसिद्ध विश्वस्त विक्रम रजपूत, देवसंस्थानचे प्रमुख विश्वस्त पोपटराव खोमणे, विश्वस्त अ‍ॅड. पांडुरंग थोरवे, मंगेश घोणे, व्यवस्थापक राजेंद्र जगताप, श्रीखंडोबा पालखी सोहळा खांदेकरी, मानकरी, ग्रामस्थ समितीचे अध्यक्ष जालिंदर खोमणे, सचिन पेशवे, रोहिदास माळवदकर, संतोष खोमणे, कृष्णा कुदळे, अरुण खोमणे, छबन कुदळे, पंडित हरपळे, माणिक पवार आदी उपस्थित होते.
रविवार, दि. 12 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजता अमावस्या सुरू होत सोमवारी दुपारी अडीचपर्यंत संपत आहे. सोमवारी सकाळी 7 वाजता कर्‍हा स्नानासाठी जेजुरी गडावरून खंडोबा देवाच्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान होईल. दुपारी 12 ते 1 च्या कालावधीत खंडोबा व म्हाळसादेवीच्या उत्सवमूर्तींना कर्‍हा नदीवर अंघोळ घालण्यात येईल, असे पेशवे यांनी सांगितले.
संबंधित बातम्या :
सोमवती यात्रेनिमित्त देवसंस्थानच्या वतीने पालखी सोहळा मार्गाची डागडुजी, चेंगराचेंगरीसारख्या दुर्घटना होऊ नयेत यासाठी पायरी मार्गावर सुरक्षा बॅरिकेड बसवण्यात आले आहेत. पायरी मार्गावर अडथळा ठरणारी अतिक्रमणे काढण्यात येणार आहेत, तर पालखी मार्गावर भाविकांना अन्नदान, चहापानाची व्यवस्था करण्यात आल्याचे देवसंस्थानचे प्रमुख विश्वस्त पोपटराव खोमणे यांनी सांगितले.
भेसळयुक्त भंडारा विक्री करू नये; अन्यथा कारवाई
लाखो भाविक सोहळ्यात भंडार्‍याची उधळण करीत असतात. यात्रा काळात काही व्यापारी भेसळयुक्त भंडारा विक्री करतात. यामुळे पालखी सोहळ्याचे मानकरी, खांदेकरी व भाविकांच्या डोळ्यांची आग होणे, चुरचुर होणे, कपाळ काळे पडणे आदी घटना घडतात. यातून चेंगराचेंगरीसारखे प्रकार घडू शकतात. यामुळे व्यापार्‍यांनी भेसळयुक्त भंडार्‍याची विक्री करू नये. पोलिसांनी यावर कारवाई करावी, अशी मागणी या वेळी करण्यात आली. याबाबत शहरातील व्यापार्‍यांना भेसळयुक्त भंडारा विक्री करू नये अन्यथा कारवाई करण्याची नोटीस जेजुरी पोलिसांनी दिल्याचे पोलिस निरीक्षक बापूसाहेब सांडभोर यांनी सांगितले.
भाविकांसाठी विविध सुविधा
पालखी सोहळ्यात चेंगराचेंगरीसारखे प्रकार होऊ नयेत यासाठी देवसंस्थानच्या वतीने खांदेकरी, मानकरी यांना ड्रेसकोड देण्यात आला आहे. यात्रेसाठी येणार्‍या भाविकांसाठी विविध सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. गडाच्या सज्जावरून सोहळ्यावर पोत्याने भंडार उधळू नये, असे आवाहन जालिंदर खोमणे यांनी या वेळी केले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT