Pune News : होर्डिंगच्या बदल्यात स्वच्छतागृहांची साफसफाई | पुढारी

Pune News : होर्डिंगच्या बदल्यात स्वच्छतागृहांची साफसफाई

पुणे : पुढारी वृत्तसेवा : येरवडा, खराडी आणि विमानतळ रस्त्यावरील चार स्वच्छतागृहांवरील 900 चौरस फूट जागा होर्डिंगसाठी उपलब्ध करून देण्यात येणार असून, या ठिकाणी 22 सीटची स्वच्छता संबंधित ठेकेदार करणार आहे. या संबंधीची निविदा काढण्यात आली आहे. महापालिकेच्या वतीने सार्वजनिक स्वच्छतागृह उभारण्यात आली आहेत. या स्वच्छतागृहांची देखभाल दुरुस्तीची कामे ठेकेदारांमार्फत केली जातात.

यासाठी महापालिका दरवर्षी लाखो रुपये खर्च करते. आता मात्र पालिकेने खर्चामध्ये बचत करण्यासाठी जाहिरात हक्काच्या बदल्यात स्वच्छतागृहांच्या देखभाल दुरुस्तीची संकल्पना पुढे आणली आहे. त्याची प्रायोगिक तत्त्वावरील सुरुवात होणार असून, येरवडा येथील दोन, खराडी आणि विमानतळ रोडवरील वर्दळीच्या ठिकाणच्या दोन अशा स्वच्छतागृहांची देखभाल दुरुस्ती केली जाणार आहे. संबंधित ठेकेदाराने पहिले सहा महिने या स्वच्छतागृहांची डागडुजी आणि सुशोभीकरण करायचे आहे. त्यानंतर 10 वर्षे स्वच्छतागृहांची देखभाल दुरुस्ती व स्वच्छता करायची आहे.

महापालिकेने शहरातील संपूर्ण स्वच्छतागृहांची साफसफाई करण्याची निविदा काढली आहे. मात्र, या निविदेतून या चार स्वच्छतागृहांना वगळण्यात येणार आहे. ज्या ठेकेदाराला काम मिळेल तो ठेकेदार या ठिकाणी व्यावसायिक जाहिरात करू शकतो. महापालिका प्रशासनाला या ठिकाणची स्वच्छता करण्यासाठी केवळ 16 लाख रुपये वार्षिक खर्च येत असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. मात्र, ज्या भागात होर्डिंग उभारण्यात येणार आहे तो भाग जाहिरातीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे.

या ठिकाणी जाहिरातीसाठी महिन्याला दीड ते दोन लाख रुपये एका होर्डिंगला उत्पन्न मिळते. त्यामुळे महापालिका तोट्याचा व्यवहार करत आहे. याऐवजी महापालिकेने होर्डिंग उभारून ठेकेदाराला चालवण्यासाठी दिल्यास महापालिकेला मोठा फायदा होणार आहे. मात्र, केवळ स्वच्छता करण्याच्या बदल्यात होर्डिंग चालवण्यासाठी देण्यात येत आहे.

हेही वाचा

Pune News : पुस्तकविश्वात नव्या पुस्तकांची पडतेय भर

Pune News : अवकाळी पावसामुळे भात पिके उद्ध्वस्त !

धुळे जिल्ह्यातील युवक-युवतींना मिळणार स्पर्धा परीक्षेचे मोफत धडे

Back to top button