पुणे: शहराच्या मध्यवर्ती भागातील मंडळांकडून सादर केल्या जाणार्या दर्जेदार आणि कलात्मक देखाव्यांमुळे गर्दी उसळते. त्याच दर्जाचे देखावे येरवडासह नगर रस्त्याच्या इतर भागातही करून पुण्यातील गणेशभक्तांनाही आकर्षित करू, असा निर्धार या उपनगरातील गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
येरवडा येथील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सांस्कृतिक कला रंगमंदिरात आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी (दि. 11) दै. ‘पुढारी’च्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या वेळी महापालिका उपायुक्त माधव जगताप, माजी आमदार जगदीश मुळीक, सौ. शीला राज साळवे मेमोरियल ट्रस्ट अध्यक्ष व माजी नगरसेवक अविनाश साळवे, सुरेंद्र पठारे फाउंडेशनचे अध्यक्ष सुरेंद्र पठारे, सतीश म्हस्के, राजेंद्र खांदवे, शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष अरुण वाघमारे आदी उपस्थित होते.
या वेळी येरवडा, खराडी, लोहगाव, चंदननगर, विमाननगर आदी भागातील मंडळांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत आपली मते मांडली. दै. ‘पुढारी’ व सौ. शीला राज साळवे मेमोरियल ट्रस्टच्या वतीने आणि पुणे पोलिस व पुणे महापालिकेच्या सहकार्याने गणेशोत्सव व्यासपीठ या बैठकीचे आयोजन केले होते.
मुळीक म्हणाले की, परिसरातील मंडळांना विसर्जनाच्या दृष्टीने असंख्य अडचणी असून, त्या सोडविण्यासाठी महापालिका तसेच पोलिस प्रशासनाने पुढे येणे गरजेचे आहे. या अडचणींतून सुटका झाल्यास लोकमान्यांना अभिप्रेत असा गणेशोत्सव पुणे शहरासह उपनगरांतही साजरा होईल. उत्सव साजरा करण्यासोबतच कार्यकर्त्यांनी सामाजिक बंधनांचाही विचार करण्याची आवश्यकता आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने प्रत्येक जण चांगले काम करतो.
आपण समाजासाठी काय देणे लागतो याचाही प्रत्येक मंडळाच्या कार्यकर्त्याने विचार करायला हवा. गणेशोत्सवामार्फत सर्वांनी एकत्र येऊन आपल्या एकीचा उपयोग विधायक कामांसाठी करतील, यात काही शंका नाही. पूर्व भागात पहिल्यांदाच हा कार्यक्रम होत असून दै. ‘पुढारी’मुळे या भागातील मंडळांना एक व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.
उपायुक्त जगताप म्हणाले की, गणेश मंडळांना पाच वर्षे कोणतीही परवानगी घ्यावी लागणार नाही, असा निर्णय घेण्यात आला होता. त्याची अंमलबजावणीही झाली आहे. दरम्यान, नव्याने शहरात आलेल्या गावांतील मंडळांसाठी नव्याने प्रक्रिया राबविण्यात येत आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रस्त्यांच्या दुरूस्तीचे काम युध्दपातळीवर सुरू आहे.
मंडळांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या परिसरात असलेल्या खड्ड्यांची माहिती दिली, तर त्याठिकाणीही कामे करण्यात येतील. शहरात राज्यासह परराज्यातून लोक देखावे पाहण्यासाठी येतात, त्यादृष्टीने वाहतूक व्यवस्था चांगली असणे गरजेचे आहे.
त्यादृष्टीनेही पोलिस प्रशासनासोबत काम सुरू आहे. मंडळांना येणार्या अडचणी समजण्यासाठी एक व्हॉटस्अप ग्रुप तयार करण्यात आला असून त्यावर येणार्या तक्रारी तसेच सूचनांचाही विचार करण्यात येत आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा होण्याची आवश्यकता आहे. नदी, तलावात विसर्जनाऐवजी हौदाचा वापर करावा.या वेळी अन्य मान्यवरांनीही मते व्यक्त केली. बैठकीचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन निवासी संपादक सुनील माळी यांनी केले.
दै. ‘पुढारी’चे मंडळांच्या पदाधिकार्यांकडून कौतुक
येरवडासह उपनगरातील गणेश मंडळांसाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी पुढारी वृत्तपत्र समूहाने जो कार्यक्रम आयोजित केला, तो स्वागतार्ह आहे. यापूर्वी पोलिसांमार्फत गणेश मंडळांच्या बैठका घेण्यात येत होत्या. मात्र, त्या सुरक्षेच्या दृष्टीने होत्या. दै.‘पुढारी’ हे एकमेव वृत्तपत्र आहे, ज्यांना उपनगरांचे महत्त्व कळाले. गणेशोत्सवात मंडळांनी विधायक उपक्रम राबवित देखावे सादर करावे, यासाठी दै.‘पुढारी’ने घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे, असे उद्गार मान्यवरांसह मंडळांच्या पदाधिकार्यांनी काढले.
या आहेत कार्यकर्त्यांच्या सूचना
मध्यवर्ती भागातील मंडळांप्रमाणेच उपनगरांतील मंडळांना महत्त्व द्यावे.
कलवड येथील खाण परिसरात विसर्जनासाठी हौद, प्रकाशव्यवस्था हवी.
वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नगर रस्त्यावरील वाहतुकीचे नियोजन व्हावे.
कल्याणीनगर परिसरात विसर्जन घाट तयार करून त्याठिकाणी हौद उभारावे.
विसर्जनादिवशी उपनगरांतही चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात यावा.
मंडळांनी सामाजिक, समाजप्रबोधनपर देखावे साकारण्यास प्राधान्य द्यावे.
प्रत्येक मंडळाने सामाजिक उपक्रम राबविण्यावर भर देण्यात यावा.