

11th admission special round
पुणे: अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतून अद्याप महाविद्यालय न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी आता प्रवेशासाठी विशेष फेरी राबवली जाणार आहे. मंगळवार, दि.12 ते 20 ऑगस्टदरम्यान संबंधित फेरी राबविण्यात येणार आहे. राज्यात अकरावी प्रवेशाच्या चार नियमित फेर्या तसेच एक सर्वांसाठी खुला प्रवेश फेरी राबविण्यात आली आहे. दरम्यान, आत्तापर्यंत तब्बल 12 लाखांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून, प्रवेशासाठी अद्यापही साडेनऊ लाखांच्या जवळपास जागा रिक्तच राहिल्या असल्याचे स्पष्ट झाले आहे.
राज्यातील अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत सर्वांसाठी खुला प्रवेश या फेरीत 3 लाख 48 हजार 874 विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर करण्यात आला आहे. प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना मुदतवाढीसह 11 ऑगस्टपर्यंत महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करण्याची संधी देण्यात आली होती. त्यानंतर आता विद्यार्थ्यांसाठी आता विशेष फेरी राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (Latest Pune News)
अकरावी प्रवेशासाठी राज्यात 9 हजार 525 महाविद्यालयांमध्ये 18 लाख 7 हजार 446 जागा कॅप प्रवेशाच्या तसेच 3 लाख 42 हजार 684 जागा कोटा प्रवेशाच्या अशा एकूण 21 लाख 50 हजार 130 जागा उपलब्ध आहेत. त्यासाठी 14 लाख 57 हजार 309 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
त्यापैकी एकूण 10 लाख 42 हजार 709 विद्यार्थ्यांनी कॅपमधून, तर 1 लाख 60 हजार 733 विद्यार्थ्यांनी कोटाअंतर्गत अशा 12 लाख 3 हजार 442 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. आता प्रवेशासाठी अद्यापही 7 लाख 64 हजार 737 जागा कॅप प्रवेशाच्या तसेच 1 लाख 81 हजार 951 जागा कोटा प्रवेशाच्या अशा एकूण 9 लाख 46 हजार 688 जागा प्रवेशासाठी उपलब्ध असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
असे आहे विशेष फेरीचे वेळापत्रक
12 ते 13 ऑगस्ट - नवीन विद्यार्थी नोंदणी अर्जाचा भाग एक दुरुस्ती करणे, कनिष्ठ महाविद्यालयांनी त्यांच्या इच्छेनुसार (व्यवस्थापन, अल्पसंख्याक) कोट्यातील जागा प्रत्यार्पित करणे.
14 ऑगस्ट - विशेष फेरीसाठी पोर्टलवर रिक्त जागा प्रदर्शित करणे.
15 ते 17 ऑगस्ट - विशेष फेरीअंतर्गत विद्यार्थ्यांना नवीन नोंदणी करणे, भरलेल्या अर्जात दुरुस्ती करणे, राज्य मंडळाच्या पुरवणी परीक्षेत एटीकेटीच्या विद्यार्थ्यांसाठी नोंदणी आणि पसंतीक्रम भरणे.
19 ऑगस्ट - विशेष फेरीसाठी प्रवेश जाहीर करणे
19 ते 20 ऑगस्ट - विशेष फेरीमध्ये अलॉटमेंट झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी मुदत देण्यात येणार आहे.